मुंबई : गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाचं वर्षही बी- टाऊनसाठी खास  ठरणार असून, या वर्षाच्या सुरुवातीलाच सेलिब्रिटी लग्नसोहळ्यांची चर्चा सुरु झाली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या साखरपुड्यांचविषयी बोललं जात असतानाच आता आणखी एका सेलिब्रिटी जोडीच्या लग्नसोहळ्याच्या चर्चा रंगत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्षी विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज असणारी ती जोडी म्हणजे अभिनेता फरहान अख्तर आणि मॉडेल, सूत्रसंचालिका, गायिका शिबानी दांडेकर यांची. काही महिन्यांपूर्वीत त्यांच्या नात्याची माहिती समोर आली होती. ज्यानंतर शिबानी आणि फरहाननेच सोशल मीडियाच्या माध्यमातून या नात्याची ग्वाही दिली. 


पाहता पाहता बऱ्याच कार्यक्रमांना ही जोडी एकत्र पोहोचू लागली आणि अखेर आता त्यांनी याच नात्यात एक नवा टप्पा सर करण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. फरहानचं हे दुसरं लग्न असून, पहिल्या पत्नीपासूनची मुलंही शिबानीसोबत फार चांगल्या पद्धतीने वावरत असल्याचं कळत आहे. त्यामुळे नात्याविषयी महत्त्वाचा निर्णय घेत त्यावर लग्नाची मोहोर लावण्याच्या निर्णयाची घोषणा फरहान येत्या काळात करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.




एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या फरहान आणि शिबानीने अद्यापही लग्नाच्या चर्चांना दुजोरा दिलेला नाही. पण, आता तो शुभदिवस दूर नाही हेसुद्धा तितकच खरं. शिबानीसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी फरहान अधुना भबानी हिच्यासोबत जवळपास १६ वर्षे वैवाहिक नात्यात होता. अनेक वर्षे एकमेकांची साथ दिल्यानंतर अखेर त्या दोघांनीही या नात्यातून वेगळं होत वेगळ्या वाटांवर जाण्याचा निर्णय घेतला.