Govinda Firing: बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) चुकून स्वत:वर गोळी झाडल्याने जखमी झाला होता. अखेर 3 दिवसांनी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जखमी अवस्थेत क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान डिस्चार्ज मिळाल्यानंतर गोविंदाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सर्वांचे आभार मानले. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या आशिर्वादामुळे मी सुखरुप आहे असं गोविंदा म्हणाला आहे. 


डिस्चार्जनंतर गोविंदा काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी सुरक्षित आहे. माझ्यासाठी ठिकठिकाणी पूजा, प्रार्थना करण्यात आल्या. मी त्या सर्वांचे आभार मानतो. माझ्यासाठी सर्वांना प्रार्थना केली. मी प्रशासनात सहभागी पोलिसांचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या आशीर्वादामुळे मी सुखरुप आहे," असं गोविंदाने मीडियाशी संवाद साधताना म्हटलं.



डॉक्टर काय म्हणाले?


गोविंदावर उपचार करणारे क्रिटीकेअर एशिया रुग्णालयातील डॉक्टर रमेश अगरवाल यांनी सांगितलं आहे की, "त्याला 3 ते 4 आठवडे विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. त्याचे व्यायाम, फिजिओथेरपी सुरु आहे. तो सध्या बरा आहे. त्यामुळे आम्ही त्याला डिस्चार्ज देत आहोत. तो आपल्या घऱी विश्रांती घेऊ शकतो".


नेमकं काय झालं?


गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबरला सकाळी 4.45 च्या सुमारास तो एका शोसाठी कोलकाता येथे 6 वाजताचे फ्लाइट पकडण्यासाठी घरातून निघणार होता. अभिनेता परवानाधारक रिव्हॉल्वर कपाटात ठेवत असताना ट्रिगर चुकून ढकलला गेला. त्यानंतर एक गोळी त्याच्या पायाला लागली.


पोलिसांना जबाब पटेना


मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गोविंदाचा (Govinda) जबाब नोंदवला आहे. मात्र पोलीस त्याच्या जबाबावर समाधानी नाहीत. गोविंदा काहीतरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. गोविंदाला अनेक प्रश्नांची नीत उत्तरं देता येत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलीस या प्रकरणात सध्या तज्ज्ञांची मदत घेत आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर पोलीस पुन्हा एकदा गोविंदाचा जबाब नोंदवू शकतात. 


खाली पडल्यानंतर रिव्हॉल्व्हरने ट्रिगर कसे केले हा मोठा प्रश्न आहे. खाली पडल्यावर रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर दाबला गेल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रश्नावर गोविंदाच्या उत्तराने पोलिसांचे समाधान झालेले नाही. इतर अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांना मिळत नाहीत. उदाहरणार्थ दुर्घटनेच्या वेळी गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमध्ये 6 गोळ्या होत्या, त्यापैकी एक गोळी सुटली.  तो शस्त्र घरीच सोडून जाणार होता तर त्याने रिव्हॉल्वरमध्ये गोळ्या का भरल्या? त्याने रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या का बाहेर ठेवल्या नाहीत?


गोविंदा दुर्घटनेशी संबंधित काही महत्त्वाची माहिती त्यांच्यापासून लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पंचनामाद्वारे सर्व काही उघड होऊ शकतं. घटनास्थळाच्या पंचनाम्यामध्ये यासंदर्भात काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांना आहे.  मंगळवारी दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत पंचनामा झाला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस तज्ज्ञांचीही मदत घेत आहेत. गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर या प्रश्नांबाबत पोलीस पुन्हा एकदा त्याचा जबाब नोंदवू शकतात.