बॉलिवूड अभिनेता आणि शिवसेना नेता गोविंदाला (Govinda) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आपल्या बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी पायाला लागल्याने गोंविदा जखमी झाला होता. यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर गोविंदाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या आशिर्वादामुळे मी सुखरुप आहे असं सांगत आभार मानले. यावेळी त्याने पोलीस, डॉक्टर आणि राजकीय नेत्यांचेही आभार मानलं. तसंच प्रसिद्धी आगीप्रमाणे आहे सांगत बंदुक बाळगण्याच्या कारणांचा उलगडा केला. 
 
"मी सुरक्षित आहे. माझ्यासाठी ठिकठिकाणी पूजा, प्रार्थना करण्यात आल्या. मी त्या सर्वांचे आभार मानतो. माझ्यासाठी सर्वांना प्रार्थना केली. मी प्रशासनात सहभागी पोलिसांचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. मला भेटण्यासाठी आलेले अभिनेते, राजकारणी यांचाही मी आभारी आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांच्या आशीर्वादामुळे मी सुखरुप आहे," असं गोविंदाने मीडियाशी संवाद साधताना म्हटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान चुकून गोळीबार झालेल्या घटनेचा उलगडा करताना गोविंदाने सांगितलं की, "जखम थोडी खोल आहे. हे झालं तेव्हा मला फार धक्का बसला होता". मी पहाटे 4.45 ते 5 दरम्यान कोलकातामधील कार्यक्रमासाठी निघत होतो. त्यावेळी माझी बंदूक खाली पडली आणि त्यातून गोळी सुटली. मला ती लागल्याचं लक्षात आलं आणि नंतर रक्त येताना दिसलं". गोविंदाने या दुर्घटनेचा इतर कशाशी संबंध लावू नये असं म्हटलं आहे. 


आयुष्याच्या अनिश्चिततेतबाबत बोलताना तो म्हणाला की, "जेव्हा आपण सकाळी उठतो आणि तयार होतो तेव्हा आपल्याला सगळं काही ठीक आहे आणि चिंता करण्याचं कारण नाही असं वाटतं. मी नेहमी आनंदी राहणारा व्यक्ती आहे. मी याबद्दल फार विचार करत नाही. पण नेहमी दक्ष राहायला हवं. कोणालाही यातून जावं लागू नये".


एका पत्रकाराने गोविंदाला बंदूक बाळगण्याचं कारण विचारलं असता अभिनेता म्हणाला, “प्रसिद्धी ही आगीप्राणे आहे. आपल्या सभोवतालच्या आगीची जाणीव ठेवली पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रसिद्धी मिळवता तेव्हा तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. बरेच लोक तुमच्यावर प्रेम करतात, तर काही लोक हेवा करतात. मत्सर ठीक आहे, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती स्पर्धात्मक बनते तेव्हा ते वेदना देणारं असतं”.