मुंबई : हिंदी कलाविश्वात आजवर विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या कथानकांचा आधार घेत चित्रपट साकारण्यात आले आहेत. यातच आता रामायणावर आधारित चित्रपट साकारला जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. नितेश तिवारी आणि रवी उद्यवार यांनी ही जबाबदारी स्वीकारली असून, त्यासाठी अभिनेता हृतिक रोशनच्या नावाला त्यांनी पसंती दिल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फिल्मफेअर'च्या वृत्तानुसार 'रामायण'मध्ये मर्यादापुरुषोत्तम राम साकारण्यासाठी हृतिकला विचारणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे त्याच्याकडूनही यासाठी सकारात्मक उत्तर आल्याची माहितीही समोर येत आहे. 


३डी प्रकारात साकारल्या जाणाऱ्या आणि प्रचंड निर्मिती खर्चातून उभ्या केल्या जाणाऱ्या या चित्रपटात निर्माते मधू मंटेना यांच्या सांगण्यावरुन अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला सीतेची भूमिका साकारण्याची संधी दिली जाण्याची चिन्हं आहेत. पण, अद्यापही याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


'इटी'शी संवाद साधताना नितेश तिवारी यांनी या आगामी चित्रपटाविषयीची उत्सुकता व्यक्त केली. सध्याच्या घडीला छिछोरे या चित्रपटामध्ये व्यग्र असलो तरीही आपण येत्या काळात या अतिभव्य आणि अदभूत अशा चित्रपटावर पुन्हा लक्ष केंद्रीत करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपल्यासाठी हे एक आव्हान असल्याचं म्हणत, या चित्रपटाचं मुळ म्हणजे देशाचं वैभव असल्याची प्रतिक्रिया दिली. 


अल्लू अरविंद, नमित मल्होत्रा आणि मधू मंटेना यांच्या निर्मितीमध्ये साकारला जाणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ अशा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यासाठी तब्बल ५०० कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचं कळत आहे. त्यामुळे सर्व गोष्टी आणि चर्तचा सुरळीत पार पडल्यास राम- सीतेच्या रुपात हृतिक आणि दीपिकाला पाहणं ही प्रेक्षकांसाठी एक परवणी ठरणार आहे.