मुंबई : अभिनेता हृतिक रोशन हा बऱ्याच काळानंतर त्याच्या एका चित्रपटामुळे  प्रकाशझोतात आला आहे. विकास बहल दिग्दर्शित 'सुपर ३०' या चित्रपटामुळे हृतिकवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर 'सुपर ३०' च्या कमाईचे आकडे उंचावत आहेत. या साऱ्यामध्ये आणखी एका कारणामुळे हा चित्रपट आणि हृतिक लक्ष वेधत आहे. ते कारण म्हणजे हृतिकचा सावळा वर्ण. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटात बी- टाऊनचा हा 'ग्रीक गॉड' सावळ्या वर्णात दाखवण्यात आला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर याविषयी काहींनी त्याची खिल्लीही उडवली आहे. पण, हृतिकने मात्र याविषयी त्याचं मत मांडत अनेकांचीच दाद मिळवली आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'शी संवाद साधताना त्याने याविषयीचं वक्तव्य केलं. 


'अग्निपथ, धूम २ आणि इतरही काही चित्रपटांमध्ये माझा वर्ण याहूनही अधिक सावळा होता', असं म्हणत एका अभिनेत्याच्या वर्णाविषयी अशा प्रकारच्या चर्चा होणं हासुद्धा वर्णभेदच झाला, असं हृतिक म्हणाला. आपण ज्यांची भूमिका साकारली, ते (आनंद कुमार) ४५ अंश सेल्शिअस इतक्या तापमानात पापड विक्री करत असतील तर, सहाजीकच त्यांच्या त्वचेचा वर्ण हा सावळा असणार, ही बाब त्याने सर्वांसमोर ठेवली. 


'एखादी भूमिका साकारण्यासाठी त्या व्यक्तीच्या वर्णाचे निकष नजरेत घेतलेच का जावेत?', असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. वर्णाला महत्त्व न देता भूमिका रुपेरी पडद्यावर अधिक प्रभावीपणे कशी साकारता येईल यालाच हृतिकने 'सुपर ३०' या चित्रपटाच्या निमित्ताने प्राधान्य दिलं. परिणामी हा अभिनेता पुन्हा प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला. 


आयआयटी जेईई या स्पर्धा परीक्षांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करत त्यांच्या भविष्याच्या वाटा प्रकाशमान करण्यासाठी हातभार लावणाऱ्या आनंद कुमार यांच्या कर्तृत्वाला 'सुपर ३०' या चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे. हृतिकची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून टेलिव्हिजन अभिनेत्री मृणाल ठाकूर हीसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.