Video : `कांदा लेनेका, चौकंडी काटनेका`; जॅकी श्रॉफनं सांगितली भेंडीच्या भाजीची सोपी रेसिपी
Jackie Shroffs viral bhindi recipe : बॉलिवूडमध्ये `भिडू` म्हणून ओळखला जाणारा अभिनेता जॅकी श्रॉफ आता नव्या रेसिपीसह नेटकऱ्यांच्या भेटीला आला आहे.
Jackie Shroffs viral bhindi recipe : 'अंडा कडीपत्ता' या रेसिपीला कमालीचं प्रेम मिळाल्यानंतर आणि अनेकांनीच आपल्या स्वयंपाकघरात हा पदार्थ बनवून त्याची चव चाखली. त्यानंतर आता जॅकी श्रॉफ यांनी पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत एका पदार्थाची रेसिपी शेअर केली आहे. बरं, ही रेसिपी इतकी सोपी आहे, की गृहिणी तर जॅकीदाचे आभारच मानतील. ही रेसिपी आहे भेंडीच्या भाजीची. नाकं मुरडू नका, आधी रेसिपी पाहा, ती भाजी बनवून पाहा आणि मग बोला...
कारण या भेंडीच्या भाजीसाठी अवघ्या पाच गोष्टींची गरज आहे. तेल, कांदा, भेंडी, मीठ आणि लसणाची एक पाकळी. आता राहिला मुद्दा ही भाजी बनवायची कशी? तर, हल्लीच एका मुलाखतीदरम्यान जग्गूदादानं म्हणजे जॅकी श्रॉफ यांनी त्यासाठीची रेसिपीसुद्धा सांगितली. भेंडी आणि कांदा घ्यायचा आणि कांदा चौकंडी कापायचा. अर्थात त्याचे चौकोनी तुकडे करायचे. कांदा कापल्यानंतर तो पण्यात ठेवायचा अन्यथा त्यावर रोगजंतू बसण्याचा धोका वाढतो.
पुढे रेसिपी सांगताना जॅकीदा म्हणातयत, भेंडीचेही तुकडे करून घ्यायचे. 'इतना इतनाही काटनेका' असं म्हणताना भेंडी नेमकी किती बारीक कापायची हेसुद्धा त्यांनी सांगितलं. यानंतर एका भांड्यात तेल घेऊन त्यामध्ये कांदा टाकायता आणि भेंडीही त्यात टाकायची. हे मिश्रण हलवायचं नाही. त्यावर झाकण लावायचं. 'थेडी देर दिख जायेगा मस्के की तरह एकदम ऐसा हो जाएगा...' असं म्हणत भाजी वाफेवरच शिजवायची हेसुद्धा त्यांनी सांगितलं. आला इथून पुढं भाजीमध्ये लसणाची एखादी पाकळी टाकायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पोळी किंवा भाकरीसोबत या भाजीची चव चाखायची.
हेसुद्धा वाचा : उपासमार न करता वजन कमी करायचंय? आलिया भट्टची शेफ देतेय Healthy Eating Tips
गृहिणींसाठी कमाल रेसिपी...
बऱ्याचदा गृहिणींना अचानक पाहुणे आले किंवा घरात भेंडीव्यतिरिक्त काहीच भाजी नसेल तर नेमकं काय बनवावं असा प्रश्नच पडतो. त्यातही त्या घाईत असल्या तर मग विचारून सोय नाही. अशा सर्वजणींसाठी किंवा मग सर्वजणांसाठी जॅकीदा यांनी सांगितलेली ही रेसिपी म्हणजे हुकमी एक्का. एका इंफ्लुएन्सर जोडीनं ही भाजी करून पाहिली आणि त्याचा व्हिडीओसुद्धा सर्वांसोबत शेअर केला. मग, तुम्ही कधी बनवताय ही भाजी?