आता आणखी काय उरलंय? करण जोहरच्या पार्टीत कोणाचीही तमा न बाळगता गर्लफ्रेंडसोबतच हृतिकची हजेरी
चर्चा व्हायच्या त्या झाल्या....
मुंबई : निर्माता दिग्दर्शक करण जोहर याचा 50 वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं यशराज स्टुडिओमध्ये एका दिमाखदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. नवेजुने बरेच कलाकार या पार्टीला हजर असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. (Karan johar 50 borthday party)
करणच्या खास मित्रांपासून धर्मा प्रोडक्शनमध्ये काम करणाऱ्या मंडळींचीही यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली.
आमिर खान, किरण राव, प्रिती झिंटा, विजय देवेरकोंडा, टायगर श्रॉफ, श्वेता बच्चन, अपूर्व मेहता या आणि अशा इतरही सेलिब्रिटींची इथं गर्दी पाहायला मिळाली. पण, या साऱ्यांमध्ये चर्चा झाली ती म्हणजे एका स्टार कपलची.
आतापर्यंत माध्यमांपासून लपून छपून एकमेकांना भेटणारी ही जोडी करणच्या पार्टीला मात्र एकमेकांचा हात धरुनच आली. जणू काही नात्याची ग्वाहीच ते देत होते. ही जोडी म्हणजे अभिनेत्री आणि परफॉर्मर सबा आझाद आणि अभिनेता हृतिक रोशन. (Hrithik Roshan and Saba Azad)
सबा आणि हृतिकनं पार्टीच्या निमित्तानं रेड कार्पेटवर एंट्री मारली आणि त्यांचीच झलक टीपण्यासाठी छायाचित्रकारांनी घाई केली.
काळ्या रंगाचा सॅटिन शाईन वन पिस, गोल्डन क्लच, मोकळे केस आणि लाल रंगाची लिपस्टीक असा सबाचा लूक यावेळी पाहायला मिळाला. तर, हृतिकनं या पार्टीसाठी काळ्या रंगाच्या सूटला प्राधान्य दिलं होतं.
एकमेकांना हे दोघंही शोभून दिसत होते. त्यांचं एकमेकांसोबत असणंच त्या क्षणाला चार चाँद लावून गेलं.
सुझॅन खान हिच्यासोबतच्या वैवाहिक नात्यात दुरावा आल्यानंतर बऱ्याच काळानं हृतिकचं नाव सबाशी जोडलं गेलं. फार कमी वेळात त्या दोघांची जवळीक वाढली आणि आता तर या नात्यावर शिक्कामोर्तबही झालं. आणखी काय उरलं... ?