सारासाठी कार्तिकने असं काही केलं की चाहतेही झाले भावुक
या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरत आहे
मुंबई : अभिनेता सैफ अली खान याची मुलगी, सारा अली खान हिने साधारण वर्षभरापूर्वी हिंदी कलासृष्टीत पदार्पण केलं. केदारनाथ या चित्रपटामागोमाग तिने इतरही काही चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या सैफची ही लेक तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे.
इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे 'लव्ह आज कल'. सारा या चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. मुख्य म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरत आहे. कित्येकांनी तर, हे दोघंजण रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं.
कार्तिक आणि सारानेही या चर्चांना कधीच नकारात्मक कल दिला नाही. बरं, त्यांनी याचा स्वीकारही केला नाही. अशाच या चर्चांच्या वर्तुळात सध्या हे दोघं लक्ष वेधत आहेत ते म्हणजे एका फोटोमुळे. सोशल मीडियावर खुद्द कार्तिकनेच शेअर केलेल्या या फोटोममध्ये सारा आणि कार्तिक यांना पाहून चाहत्यांनाही यावर प्रतिक्रिया देण्यापासून कोणी रोखू शकलेलं नाही.
चर्चेत असणारा हा फोटो खास ठरण्याचं कारण म्हणजे, यामध्ये कार्तिक चक्क साराला जेवण भरवत आहे. 'काफी दुबली हो गई हो... आओ पहले जैसी सेहत बनायें', असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. फोटो पाहताना, काही नाही.... तरी बरंच काही..... अशीच एक वेगळी आणि अव्यक्त भावना डोकावत असल्याचं जाणवतं. कार्तिक- साराची ही केमिस्ट्री आता त्यांच्या आगामी चित्रपटाला फायद्याची ठरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
यंदाच्या वर्षी १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी सारा- कार्तिकची मुख्य भूमिका असणारा 'लव्ह आज कल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यामध्ये दोन वेगळ्या काळातील प्रेमकथा आणि त्यांच्या साथीनेच बदलणारी नाती, प्रेम यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.