मुंबई : Coronavirusमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. ज्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर बहुतांशी, जवळपास सर्व कामं, व्यवहार ठप्प आहेत. कलाविश्वातही गेल्या बऱ्याच दिवसांपासून कोणतीही हालचाल सुरु नाही. मात्र याच कलाविश्वातील सेलिब्रिटींच्या जीवनात मात्र सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहसा चित्रपट, जाहीराती, विविध कार्यक्रमांमध्ये व्यग्र असणारे कालाविश्वातील लहानांपासून मोठ्या कलाकारांपर्यंत सर्वच मंडळी सध्या त्यांच्या घरीच काही खास क्षण व्यतीत करत आहेत. कुटुंबीयांसमवेत आयुष्याच्या या टप्प्यावरही ते आनंदी राहत आहेत. याच साऱ्यामध्ये एका बी टाऊन अभिनेत्याचा मात्र चांगलाच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून करायला गेलो एक, झालं एक असाच काहीसा अनुभव सर्वांपुढे मांडणारा हा अभिनेता आहे, कार्तिक आर्यन. 


'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटापासून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणाऱ्या या अभिनेत्याने होम क्वारंटाईनच्या काळात थेट स्वयंपाकघराची वाट धरली आहे. याची प्रतिची काही दिवसांपूर्वी आलीच होती. पण, यावेळी निमित्त खास होतं. जवळपास सात वर्षांनतर कार्तिक त्याच्या बहिणीचा वाढदिवस घरी साजरा करत होता. आता बहिणीचा वाढदिवस म्हटल्यानंतर या सेलिब्रिटी भावाने तिच्यासाठी एक खास केक बनवण्याचं ठरवलं. 



मोठ्या उत्साहात एक छोटासा केक बनवण्यासाठी निघालेल्या कार्तिकचा हा प्रयत्न काहीसा फसला आणि त्याच्या छोट्याश्या केकचं एक मोठंसं बिस्कीट झालं. खुद्द कार्तिकनेच बहिणीच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्येही असंच काही लिहिलं आहे. हे फोटो पोस्ट केल्यानंतर सेलिब्रिटी मित्रांनीही कार्तिकच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.


 


अभिनेता अर्जुन कपूरनेही त्याच्या बहिणीला शुभेच्छा दिल्या. तेव्हा त्याला उत्तर देत कार्तिकने पेटीएमच्या माध्यमातून गिफ्ट पाठवण्यास सांगत इथेसुद्धा खऱ्या अर्थाने सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं असं म्हणायला हरकत नाही.