चिंताजनक : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याला कोरोनाची लागण
हॉलिवूडनंतर आता बॉलिवूडला देखील कोरोनाची झळ लागली आहे.
मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हॉलिवूडनंतर आता बॉलिवूडला देखील कोरोनाची झळ लागली आहे. कलाविश्वातील प्रसिद्ध गायिका कनिका कपूरनंतर आता प्रसिद्ध अभिनेता किरण कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. सांगण्यात येत आहे की किरण कुमार यांना सर्दी, ताप, खोकला त्याचप्रमाणे श्वास घेण्यास कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नव्हते. तरी देखील कोरोनाची लक्षणं नसतानाही त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
किरण यांना सध्या त्यांच्या राहत्या घरी आयसोलोशनमध्ये ठेवण्यात आले आहे. लवकरच त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. बॉलिवूडमधील कलाकार किरण कुमार यांना कोरोनाची लागण होण्यापूर्वी गायिका कनिका कपूरला या धोकादायक विषाणूची लागण झली होती.
जवळपास पाच चाचण्यांनंतर तिचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले. आता तिची प्रकृती उत्तम आहे. सध्या ती लखनऊमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहत आहे. कनिका कपूरनंतर आता किरण कुमार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत देशात १ लाख २५ हजार १०१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ हजार ७२० रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे ५१ हजार ७८३ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत.