मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या असभ्य वर्तनाच्या आरोपांचं अभिनेते नाना पाटेकर यांनी खंडन केलं आहे. ‘टाईम्स नाऊ’शी संवाद साधताना नानांनी याविषयी आपली प्रतिक्रिया देत तनुश्रीविरोधात कायदेशीर पावलं उचलण्याचा इशाराही दिला आहे. त्यासोबतच त्यांनी चित्रीकरणादरम्यान त्यावेळी सेटवर असणाऱ्या युनिटकडून यासाठी मदत घेणार असल्याचंही सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘लैंगिक शोषण... हे म्हणूच कसं शकतात. त्यावेळी माझ्यसोबत सेटवर ५०-१०० लोक उपस्थित होते. त्यामुळे आता कायद्याच्याची वाटेने काय करता येईल याकडे मी जास्त लक्ष देत आहे’, असं ते म्हणाले. त्याशिवाय वारंवार माध्यमांशी याविषयी बोलण्यात काही अर्थ नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


एकिकडे समाजोपयोगी उपक्रमांमध्ये हिरीरिने सहभागी होणाऱ्या नानांवर झालेले हे आरोप बऱ्याच चर्चांना वाचा फोडून गेले.


त्याचविषयीच आपली भूमिका मांडत कोणीही येईल, काहीही बोलून जाईल. पण, मी मात्र माझं काम करतच राहणार असं त्यांनी स्पष्ट केलं.


‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर जवळपास दहा वर्षांपूर्वी नानांनी आपल्याशी असभ्य वर्त केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. त्याशिवाय त्यावेळी आपल्या पाठिशी कोणीच उभं राहिलं नसल्याचं म्हणत तिने चित्रपटाच्या निर्माते- दिग्दर्शकांवरही निशाणा साधला होता.


नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं हे अनेकांनी पाहिलं पण कोणीही माझ्यामागे उभं राहिलं नाही, सगळ्यांनीच केवळ बघ्याची भूमिका निभावली असं ती म्हणाली होती. नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. कलाविश्वात अनेकांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही असा आरोप तिने केला होता.