`मुस्लिमांचा द्वेष करणं ही तर आपल्या देशातली नवी फॅशन`; नसिरुद्दीन शाह याचं रोखठोक मत
Naseeruddin Shah : महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टपणे आपल्या भूमिका मांडणाऱ्या आणि वेळ पडल्यास प्रशासनाविरोधी सूर आळवण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह.
Naseeruddin Shah On Muslims: दर्जेदार अभिनय, सिनेजगताप्रती असणारी ओढ आणि प्रचंड समर्पकता अशा गुणांमुळं गेली कित्येक दशकं भारतीय चित्रपट जगतात नसिरूद्दीन शाह यांनी मानाचं स्थान मिळवलं आहे. एखादं नाटक असो किंवा दमदार कथानकाचा चित्रपट, आपल्या वाटेला आलेल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतून ती जीवंत करणारे नसिरुद्दीन शाह हे कलाकार म्हणून वेळोवेळी समृद्ध ठरले. पण, लोकशाही राष्ट्रातील एक नागरिक म्हणूनही ते कायमच विविध विषयांवर आपली मतं मांडताना दिसले.
हल्लीच प्रदर्शित झालेल्या 'ताज: रेन ऑफ रिवेंज' या सीरिजमुळेही शाह चर्चेचा विषय ठरत आहेत. पण, एक असाही विषय आहे ज्यामुळं त्यांनी सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. देशातील सद्यस्थिती पाहता त्यांनी एका प्रतिष्ठित माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत अतिशय संवेदनशील मुद्द्यावर प्रकाश टाकला.
काय म्हणाले शाह?
भारतात सध्या मुस्लिमांप्रती असणारी द्वेषाची भावना म्हणजे जणू एक फॅशनच होत आहे असं वक्तव्य करत चित्रपटांच्या माध्यमातून सरकार ती अतिशय हुशारीनं देशभरात पसरवत असल्याचं परखड मत मांडलं.
'ही वेळ विचलित करणारी आहे. मुस्लिमांचा द्वेष करणं ही हल्ली फॅशनच झालीये. सुशिक्षितांमध्येही ही फॅशन प्रचलित आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे की, काही चित्रपट आणि कार्यक्रमांना या भावनेचा प्रसार करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने वापरलं जात आहे', असं ते म्हणाले.
हेसुद्धा वाचा : IPL 2023 Final Highlights : थाला तूच रेsss; सामना गमावणाऱ्या Gujrat Titans चं माहीसाठी भावनिक ट्विट, हेच खरं स्पोर्ट्समन स्पिरीट
केंद्र सरकारवर निशाणा साधत त्यांनी (सत्ताधारी पक्षानं) अतिशय हुशारीनं हा मनसुबा साधल्याचंही शाह म्हणाले. यावेळी त्यांनी देशातील राजकीय पक्ष निवडणुकांसाठी धर्माचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून त्याचा वापर आपले हेतू साधण्यासाठी करतात ही बाब अधोरेखित करत निवडणूक आयोग मात्र या परिस्थितीतही मौन बाळगून असतो हे वास्तव मांडताना तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणीही नेता 'अल्लाह हू अकबर' असं म्हणून मत मागण्यासाठी गेला असता तर आतापर्यंत वादाचा विषय ठरला असता, असं म्हणत शाह यांनी निवडणूक आयोगाला फटकारलं.
तो दिवस दूर नाही....
राजकारणामध्ये प्रचारासाठी धर्माचा वापर आणि त्याभोवती फिरणारी परिस्थिती पाहता पंतप्रधानांची याप्रती असणारी भूमिकाही समाधानकारक नसल्याचा सूर त्यांनी आळवला. धर्माच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याचा सामना त्यांना पराभवाच्या रुपात करावा लागला असं म्हणताना त्यांनी आता देशात निवडणुकांमध्ये धर्माचा वापर होणं लवकरच संपुष्टात येईल असं सूचक वक्तव्य केलं. निवडणूक आयोगाचं मौन आता लवकरच सुटेल असं म्हणताना त्यांनी पुन्हा आपला मोर्चा देशातील राजकीय परिस्थितीकडे वळवत ही वेळ पराकोटीची असल्याचं स्पष्ट केलं.