शेतात राबतोय राष्ट्रीय पुरस्कार विजेता बॉलिवूड अभिनेता
सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड चर्चेत
मुंबई : CORONAVIRUS कोरोना, लॉकडाऊन आणि या सर्वच परिस्थितीमध्ये प्रत्येकजण आपल्या परिनं स्वत:चा विरंगुळा करत आहे. यामध्ये कलाकार मंडळीसुद्धा मागे नाहीत. याचीच प्रचिती एका अतिशय लोकप्रिय कलाकाराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओतून येत आहे.
असामान्य भूमिकांना न्याय देत कलाविश्व गाजवणाऱ्या या अभिनेत्यानं मुळ गावी जात थेट शेताची वाट धरली आहे. फक्त वाटच धरली नाही. तर, त्यांनं शेतात जाऊन कामालाही सुरुवात केली आहे. खऱ्या अर्थानं मातीशी नाळ जोडला गेलेला हा अभिनेता आहे नवाजुद्दीन सिद्दीकी.
साधारण महिन्याभरापूर्वीच नवाज त्याच्या मुळ गावी म्हणजेच बुधना येथे गेला आहे. तेव्हापासूनच तो या ठिकाणी चांगलाच रमला असल्याचं कळत होतं. आता हा व्हिडिओ त्याच माहितीत भर टाकत आहे. जवळपास २० वर्षांसाठी शेती आणि त्याच्याशी निगडीत कामं करुन कलाविश्वाकडे वळलेल्या या अभिनेत्यानं पुन्हा एकदा त्याच वाटांवर जात आयुष्य एका वेगळ्यात अंदाजात जगण्याचा आनंद लुटला आहे.
'डन फॉर द दे', म्हणजेच आजच्यासाठी इतकं पुरे असं म्हणत नवाजनं हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो शेतामध्ये पंपानं येणाऱ्या पाण्यात हात धुताना दिसत आहे, तर दुसऱ्याच क्षणाला तो शेतकामही करताना दिसत आहे. नवाजचा हा अंदाजही त्याच्या भूमिकांप्रमाणंच चाहत्यांची मनं जिंकत आहे.
नवाजनं शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांनी त्याच्या साध्या राहणीमानाची दाद दिली आहे. काहींनी त्याच्यात दडलेल्या अतिशय साध्याभोळ्या स्वभावाचं कौतुक केलं आहे, तर आपल्या खऱ्या रुपाशी आणि परिस्थितीशी सातत्यानं जोडलं जाण्याच्या त्याच्या गुणाचंही कौतुक अनेकांनी केलं आहे.