मुंबई : 'मै सर्वसक्तिसाली.... गणेस गायतोंडे....' असं म्हणत 'गणेश गायतोंडे' हे पात्र अशा कितीतरी बहुविध भूमिका रुपेरी पडद्यावर जीवंत करणाऱ्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने नेहमीच त्याच्या अभिनयाचा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. चित्रपटांपासून ते वेब सीरिजपर्यंत प्रत्येक वेळी आपल्या वाट्याला आलेली भूमिका अगदी शिताफीने हाताळणाऱ्या नवाजने चित्रपट समीक्षकांबद्दल मात्र नाराजीचा सूर आळवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पिंच' या प्रश्नेत्तरं आणि गप्पांचं सत्र असणाऱ्या कार्यक्रमात अभिनेता अरबाज खान याच्या काही प्रश्नांची उत्तरं देत नवाजने दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. ज्यामध्ये तो आपल्या भूमिकांच्या निवडीवर आलेल्या प्रतिक्रियांविषयीसुद्धा लक्षवेधी वक्तव्य करत आहे. अमुक एक भूमिका साकारली म्हणून नवाजला धारेवर धरणाऱ्या एका युजरला उत्तर देत तो म्हणाला, 'मी एक अभिनेता आहे, मी प्रत्येक भूमिका साकारणार. मी माझं हे क्षेत्र मुळीच सोडणार नाही.' आपल्यावर होणाऱ्या टीकेचं उत्तर देणाऱ्या नवाजने चित्रपट समीक्षकांवर टीकास्त्र सोडल्याचं पाहायला मिळालं. 'चित्रपटांना आम्ही दोन स्टार देतो, तीन स्टार देतो.... अरे हे स्टार देणारे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला कोणी काही विचारलं आहे का?', असा थेट प्रश्न नवाजने उपस्थित केल्याचं या शोच्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. 



अभिनय विश्वात कोणाच्याही वरदहस्ताशिवाय आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित करणारा नवाज येत्या काळात 'सेक्रेड गेम्स' या प्रचंड गाजलेल्या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा आता येत्या काळात गणेश गायतोंडेचा कोणता नवा अंदाज पाहायला मिलणार याचीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.