मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. ज्यानंतर #MeToo या मोहिमेला संपूर्ण कलाविश्वातच उधाण आल्याचं पाहायला मिळालं. बऱ्याच प्रसिद्ध मंडळींची नावंही यात समोर आली. सध्याच्या घडीला या वादळात नाव पुढे आलं आहे ते म्हणजे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मिस इंडिया निहारिका सिंह हिने नवाजसोबतच्या रिलेशनशिपविषयी काही अशा गोष्टींवरुन पडदा उचलला ज्यामुळे त्याचंही या प्रकरणात नाव गोवलं गेलं. तिने केलेले एकंदर आरोप आणि नवाजची उभी केलेली प्रतिमा पाहता अनेकांना धक्काच बसला. 


निहारिकाने त्याच्यावर केलेले आरोप आणि त्यानंतर होणाऱ्या चर्चा पाहता आता 'सेक्रेड गेम्स'मधील अभिनेत्रीने त्याला पाठिंबा दिला आहे. 


'कुक्कू'च्या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री कुब्रा सैत हिने ट्विट करत आपण नवाजच्याच बाजूने असल्याचं स्पष्ट केलं. 


नात्यात आलेल्या दुराव्याला किंवा चुकीच्या वळणांना #MeToo चं नाव देण अयोग्य असल्याचं मत तिने ट्विटच्या माध्यमातून मांडलं. 



निहारिकाला या कलाविश्वात काही संकटांना आणि अडचणीच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं असेल हे मला मान्य आहे. पण, त्यामुळे नात्यात आलेल्या दुराव्याला #MeTooचा संदर्भ देत चुकीच्या पद्धतीने तो सर्वांसमोर मांडणं अयोग्य असल्याची ठाम भूमिका तिने मांडली. 


कुब्राचं हे ट्विट पाहता गणेश गायतोंडेला कुक्कूचा पाठिंबा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.