#kashmir : `सौ सौ सलाम आपको....!`, परेश रावल यांच्याकडून मोदींची प्रशंसा
पाहा आणखी काय म्हणाले परेश रावल
मुंबई : राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला. शिवाय काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेला अनुच्छेद ३५ A हटवण्यात आल्याची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली. ज्यानंतर राजकीय पटलासोबतच विविध ठिकाणी याविषयीचे पडसाद उमटले.
राजकीयवर्तुळात, राज्यसभेतही या प्रकरणी संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाचा कलाविश्वातूनही काही दिग्गज सेलिब्रिटींनी याविषयी त्यांचे विचार व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय कारकिर्दीदरम्यान चर्चेत राहिलेल्या परेश रावल यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 'आज आपल्या मातृभूमीला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं आहे. आज खऱ्या अर्थाने भारत एकवटला आहे. जय हिंद!', असं रावल यांनी ट्विटमध्ये लिहिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ट्विटर हँडलचा उल्लेख करत त्यांनी मोदींना आपले शत् शत् नमन असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचा एक जुना फोटोसुद्धा शेअर केला आहे.
'अब कोई बीमार नहीं पड़ेगा!', असं म्हणत रावल यांनी आणखी एक उपरोधिक ट्विटही केलं आहे. ज्यामध्ये मोदी सरकारच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. ही पोस्ट करत असताना त्यांनी एका व्हायरल मेसेजचा आधार घेतला आहे. रावल यांनी केलेले हे ट्विट आणि त्यांची एकंद भूमिका पाहता काही क्षणांमध्ये त्यांच्या या ट्विटला अनेकांनी शेअर आणि लाईक करत त्यांचा पाठिंबा दर्शवला आहे.