मुंबई : मोबाईल नेटवर्क मिळत नाहीये, कॉल ड्रॉप होत आहे अशा कित्येक समस्या अनेकांकडून वारंवार व्यक्त केल्या जातात. अगदी सेलिब्रिटी मंडळीसुद्धा मागे नाहीत. अशा सेलिब्रिटींमध्ये आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. हे नाव आहे, ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांचं. सोशल मीडियाच्या माध्यमातून रावल यांनी थेट ट्विट करत वोडाफोन या कंपनाला धारेवर धरलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Vodafone is a lousy network and shameless too !, असं लिहित परेश रावल यांनी वोडाफोनवर थेट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. नववर्षाचे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत असतानाच रावल यांचं हे ट्विट या वातावरणाला वेगळंच वळण देऊन गेलं. त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनीच त्यावर व्यक्त होत आपण तोंड दिलेल्या परिस्थितीविषयीसुद्धा सांगितलं. मुख्य म्हणजे सध्याच्या घडीला रावल यांचं ट्विट नसलं तरीही त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया मात्र सोशल मीडियावर चर्चांना वाव देत आहेत. 



काही युजर्सनी रावल यांना जिओची सेवा वापरण्याचा सल्ला दिला. त्यावर जिओच्या ट्विर हँडलपैकीच एका हँडलवरुन याची दखल घेत या गोष्टीला दुजोराही देण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारीचा सूर आळवणाऱ्या रावल यांच्या ट्विटची जितक्या ताडीने दखल घेतली गेली, तितक्याच ताडकीने त्यांना उदभवणाऱ्या अडचणी दूर करण्यास वोडाफोन किंवा इतर कंपन्यांनी प्रयत्न केला तर कदाचित अशा तक्रारींची संख्याही कमी होईल. 



दरम्यान, वोडाफोनवर ताशेरे ओढणारे परेश रावल येत्या काळात काही अफलातून चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटांच्या रांगेत 'कुली नंबर १' आणि 'हंगामा'च्या रिमेक आणि सिक्वलचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय 'तूफान' या चित्रपटातही ते महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.