मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रेमाचेच वारे सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अशा या वातावरणात आतचा थेट या दोघांच्या लग्नाच्या पत्रिकेचाच फोटो व्हायरल होत आहे. एकिकडे आलिया आणि रणबीरने खुलेपणाने त्यांच्या नात्याची स्वीकृती देण्यास सुरुवात केल्यानंतर लगेचच त्यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या सेलिब्रिटी जोडीच्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्रिकेत छापल्याप्रमाणे रणबीर आणि आलियाचं लग्न ११ मे रोजी होणार आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडेल. अनेक सेलिब्रिटी डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य देत असताना रणबीर आणि आलिया मात्र मुंबईतच लग्न करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही आणखी एक आनंदाची गोष्ट आहे. रणबीर आणि आलियाच्या लग्नपत्रिकेवर एक नजर टाकली असता ती अत्यंत साधी आणि तितकीच सुरेख असल्याचं लक्षात येत आहे. प्रेमाचा रंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल रंगावर सोनेरी अक्षरांची सांगड या पत्रिकेत घालण्यात आली आहे. 



इतकंच नव्हे तर, गेल्या काही दिवसांपासून रणबीर, आलिया आणि या दोघांचे कुटुंबीयसुद्धा लग्नाच्या तयारीत व्यग्र असून, वेडिंग प्लॅनरशी चर्चा करत असल्याचं म्हटलं जात होतं. पण, आलियाची आई, सोनी राजदान यांनी मात्र हे वृत्त फेटाळलं आहे. आलियाच्या आईने लग्नाच्या चर्चांना दुजोरा दिला नसला तरीही आता ही सुरेख अशी पत्रिका मात्र बरंच काही सांगून जात आहे. त्यामुळे ११ मे या दिवसाचीच प्रतिक्षा अनेकांना लागली आहे, असं म्हणायला हरकत नाही. 


(टीप: हे एक काल्पनिक वृत्त असून, April Fool एप्रिल फूल या दिवसाच्या उद्देशानेच ते रचण्यात आलं आहे. याच्या माध्यमातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणालाही अपमानित करण्य़ाचा आमचा हेतू नाही.)