मुंबई : कलाविश्वं  हे एखाद्या कुटुंबाप्रमाणे असून, या कुटुंबात वावरणाऱ्या सदस्यामध्ये अर्थात सेलिब्रिटींमध्ये बऱ्याचदा वादही होतात. हे वाद अनेकदा इतक्या विकोपास जातात की कालांतराने त्याला आरोप- प्रत्यारोपांचं खतपाणीही मिळतं. मग, अप्रत्यक्ष टोमणेबाजी, एकमेकांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये टाळणं, वगैरे वगैरेची सत्रही सुरू होतात. सध्याच्या घडीला बी- टाऊमध्ये चर्चा होतेय ती म्हणजे अभिनेत्री कंगना रानौत आणि आलिया भट्ट यांच्यात पडलेल्या ठिणगीची. त्यांच्या याच वादात आता एका बॉलिवूड अभिनेत्याने उडी घेतली आहे. रुपेरी पडद्यावर आव्हानात्मक भूमिकांना न्याय देणारा आणि आलियासोबत स्क्रीन शेअर करणारा तो अभिनेता आहे, रणदीप हूडा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणदीपने एक ट्विट करत त्यात आलियाच्या नावे संदेश लिहिला आहे. त्याशिवाय त्याने या ट्विटमध्ये नाव न घेता एका अभिनेत्रीचाही उल्लेख केला आहे. रणदीपने मोठ्या शिताफीने त्या अभिनेत्रीचं नाव घेणं टाळलं असलं, तरीही त्याने वापरलेल्या काही संज्ञा पाहता 'क्वीन' कंगनालाच उद्देशून हे ट्विट करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. त्याच्या या ट्विटला आलियानेही उत्तर दिलं आहे. 


'आलिया... क्वचित प्रसंगीच समोर येणाऱ्या आणि सक्रिय असणाऱ्या कलाकारांच्या आणि बऱ्याच अंशी अतिशय पीडित अशा कलाकारांच्या वक्तव्याचा तू तुझ्या कामावर काही परिणाम होऊ देत नाही आहेस, हे पाहून मला आनंद होत आहे', असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं. त्याच्या या ट्विटचा रोख आता संपूर्ण कलाविश्वाच्याच लक्षात आला आहे. अर्थातच क्वीन कंगनासोबतचं रणदीपचं समीकरणही फार चांगलं नाही, हेसुद्धा सर्वज्ञात आहे. त्यामुळे आलिया- कंगनाच्या वादात त्याने सहाजिकपणे आलियाच्याच बाजूने ट्विट करत आपलं मत मांडलं. 



काय आहे, आलिया- कंगनाचा वाद? 


'मणिकर्णिका...' या चित्रपटाला पाठिंबा न देण्याच्या मुद्द्यावरुन कंगनाने आलियावर निशाणा साधला होता. इतक्यावरच न थांबता ती करण जोहरच्या हातची बाहुली असल्याचंही कंगना म्हणाली होती. क्वीन कंगनाच्या या वक्तव्यावर आलियाने मात्र मौन बाळगण्यालाच प्राधान्य दिलं होतं. त्यामुळे आता या वादात पुढचं वळण नेमकं असणार तरी काय, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.