मुंबई : अनेकदा अमूक एक चित्रपट किंवा मालिका, वेब सीरिज प्रदर्शित होऊन त्या कलाकृतीला लोकप्रियता मिळाली, की त्यातील मध्यवर्ती भूमिकेत दिसलेल्या कलाकारांनाच या साऱ्याचं श्रेय देण्यात येतं. सहायक भूमिकेत दिसणारे कलाकार मात्र काळाच्या पडद्याआ कुठेतरी दिसेनासे होतात. अभिनय आणि कलेचा वरदहस्त असतानाही त्यांना मात्र यशापासून दूरच रहावं लागतं. या साऱ्याला जबाबदार असते ती म्हणजे परिस्थिती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'अग्निपथ' चित्रपटातील एका कलाकारासोबत सध्या असंत काहीसं घडलं आहे. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, टीनू आनंद, डॅनी डॅन्ग्जोपा अशा अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. पण, रेशम अरोरा नावाच्या कलाकाराला मात्र यापासून वंचित रहावं लागलं. 


सध्या रेशम अरोरा यांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना कराला लागत आहे. त्यांच्याकडे कोणतंही कामही नाही आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत अरोरा यांनी अनेक चांगल्या भूमिका बजावल्या आहेत. 'अग्निपथ'मध्ये ते डॉक्टरच्या भूमिकेत झळकले होते. याशिवाय 'खुदा गवाह' या चित्रपटातही ते जेलरच्या भूमिकेत दिसले होते. बऱ्याच मालिकांतूनही रेशम अरोरा यांनी अभिनय साकारला होता. 



माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सध्या आपल्यापुढं असणाऱ्या अडचणींना वाचा फोडली. लॉकडाऊन लागल्यापासून ही अशीच परिस्थिती आहे. लोकं म्हणतायत की सारंकाही सुरळीत होतंय पण, माझ्यासाठी आता कामच नाहीये. काही वर्षांपूर्वी रेशम चालत्या रेल्वेतून पडले होते. त्यानंतर एका चित्रीकरणादरम्यान त्यांच्या पायावर जनावर चावलं ज्यामुळे काही काळ त्यांना चालताही येत नव्हतं. त्यांच्या पत्नीची दृष्टीही आता कमी होत चालली आहे. 


चहूबाजूंनी अडचणी अंगावर येत असल्यामुळं रेशम अरोरा यांनी आता मदतीची हाक मारली आहे. सिंटाकडून त्यांना मदत मिळाली आहे. पण, तीसुद्धा पुरेशी नाही. या समयी ते अगदी हतबल असून, आपल्यासाठी काहीच उरलं नसल्याची भावना त्यांच्या मनात घर करु लागली आहे. सहकलाकार आपली आर्थिक मदत करतील अशी आशा ते करत आहेत.