World Cup 2019 : भारतीय क्रिकेट संघाविषयी हे काय म्हणाले ऋषी कपूर ?
बहुतांश खेळाडू.....
मुंबई : कलाविश्वापासून दूर असले तरीही ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र प्रेक्षकांच्या कायमच संपर्कात आहेत. ताज्या घडामोडी आणि इतरही अनेक मुद्द्यांवर ते आपली मतं मांडत असतात. सध्याही ऋषी कपूर त्यांच्या अशाच एका ट्विटमुळे प्रकाशझोतात आले आहेत. कारण हे ट्विट आहे World Cup 2019 साठी नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या भारतीय क्रिकेट संघाविषयीचं.
सोमवारी World Cup 2019 मध्ये भारतीय संघातील खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली. पंधरा खेळाडूंच्या याच संघाविषयी कपूर यांनी ट्विट करत एका वेगळ्याच मुद्द्याकडे लक्ष वेधलं. संघात सहभागी खेळाडूंची लहान छायाचित्र असणारा एक फोटो शेअर करत कपूर यांनी या ट्विटमध्ये थेट त्यांच्या दाढी- मिशांविषयी लिहिलं. गेल्या काही वर्षांपासून दाढी, मिशांचा ट्रेंड भारतीय क्रिकेट संघातही पाहायला मिळत आहे. याच रुबाबाविषयी कपूर यांचं मात्र काहीसं वेगळं मत आहे.
'या फोटोकडे उदाहरण किंवा संदर्भ म्हणून पाहू नका. पण, आपले अनेक क्रिकेटपटू दाढी- मिशा का ठेवतात? सगळेच सॅमसन आहेत का? (आठवतंय का त्यांच्या केसात किती ताकद होती?) एक बाब निश्चित आहे की, हे सर्व खेळाडू त्याशिवाय अधिक स्मार्ट आणि डॅशिंग दिसतात', असं कपूर यांनी ट्विटमध्ये लिहित हे आपलं केवळ निरिक्षण असल्याचं स्पष्ट केलं. ऋषी कपूर यांनी या ट्विटमधून प्राचीन इस्रायली जज सॅमसनचा उल्लेख करत त्याच्याशी या खेळाडूंची तुलना केली होती.
सुरुवातीला त्यांच्या या ट्विटला संदर्भ अनेकांना लागला नाही. पण, अखेरच गुगलच्या मदतीने सॅमसन कोण आहे, याविषयीची माहिती मिळताच त्यांच्या या ट्विटचा रोख लक्षात आला. ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये असून, आजारपणाच्या उपचारासाठी ते परदेशी गेल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे परदेशात असतानाही भारतातील घडामोडींविषयी वेळोलवेळी आपलं मत मांडायला ते विसरत नाहीत हेच त्यांचं ट्विट पाहता लक्षात येत आहे.