महिला सक्षमीकरणासाठी सैफची अनोखी युक्ती
अभिनयासोबतच तो इतरही बऱ्याच क्षेत्रांमध्ये सक्रिय असल्याचं कळत आहे.
मुंबई : अभिनेता सैफ अली खान याने नुकताच त्याचा एक क्लोथिंग ब्रँड सुरु केला. 'हाऊस ऑफ पतौडी' हे त्याच्या ब्रँडचं नाव आहे. मुख्य म्हणजे हा ब्रँड सुरु करण्यासोबतच सैफने एका स्वयंसेवी संस्थेशी हातमिळवणीही केली आहे. ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील तरुणींना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
दहा मुलींना या क्लोथिंग ब्रँड अंतर्गत रोजगाराची संधी मिळणार आहे. सूत्रांचा हवाला देत 'डीएनए'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुलींना रोजगार देण्याची कल्पना ही खुद्द सैफलाच सुचली.
महिला वर्गाला सक्षम करण्यासाठी आणि एखाद्या समाजोपयोगी उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सैफचा नेहमीच पुढाकार पाहायला मिळाला आहे. त्यातही हा कपड्यांचा ब्रँड आणि त्यानिमित्ताने मिळणाऱ्या रोजगार संधीसुद्धा अतिशय महत्त्वाची भूमकिा बजावतील असा त्याचा विचार आहे. सध्या त्याच्या या निर्णयाची सर्वच स्तरांतून प्रशंसा केली जात आहे.
क्लोथिंग ब्रँडसोबत काम करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या मुली या १८ ते २२ या वयोगटातील असून, त्यांना कामावर रुजू करण्यापूर्वी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. त्याशिवाय कामाचं एकंदर स्वरुप आणि त्याविषयीचं रितसर प्रशिक्षणही त्यांना देण्यात येणार आहे. महाविद्यालयीन दिवसानंतरच या मुली या खास प्रशिक्षण शिबीरात जातील, ज्याचा आर्थिक मोबदलाही त्यांना देण्यात येणार आहे.
सैफच्या आधी बी- टाऊनमध्ये बऱ्याच कलाकारांची त्यांचे क्लोथिंग ब्रँड सुरु करत एका नव्या व्यवसायातही उडी मारली आहेत. पण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला आधार देण्यासाठी सैफने उचललेलं पाऊल खरंच प्रशंसनीय आहे, असं म्हणायला हरकत नाही.