Salman Khan on Death Threat: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) गँगस्टरच्या निशाण्यावर असून त्याला जाहीर धमक्या देण्यात आल्या आहेत. त्याला वारंवार मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. दरम्यान, नुकतंच सलमान खानने 'आप की अदालत' (Aap Ki Adalat) या कार्यक्रमात यासंबंधी भाष्य केलं आहे. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर नेमकं तो कशाप्रकारे सर्व गोष्टी हाताळत आहे याचा अनुभवही त्याने शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"असुरक्षित असण्यापेक्षा सुरक्षा असणं उत्तम. हो मला सुरक्षा देण्यात आली आहे. आता मला रस्त्यावर सायकलं चालवणं किंवा कुठे एकटं जाणं शक्य नाही. यापेक्षाही जास्त जेव्हा वाहतूक कोंडी झालेली असते तेव्हा इतकी सुरक्षा असते, वाहनांमुळे लोकांना त्रास होत असतो. लोक माझ्याकडे एक कटाक्ष टाकत असतात. गंभीर धमकी असल्यानेच सुरक्षा देण्यात आली आहे," असं सलमानने म्हटलं आहे. 


"जे काही मला सांगितलं जात आहे, त्या सर्व गोष्टी मी करत आहे. किसी का भाई, किसी की जान चित्रपटात एक डायलॉग आहे, त्यानुसार तुम्हाला 100 वेळा भाग्यवान असावं लागतं. पण मला फक्त एकदाच भाग्यवान ठरायचं आहे. त्यामुळे मला फार काळजी घ्यावी लागणार आहे," असंही सलमानने यावेळी सांगितलं. 


पुढे सलमानने सांगितलं की "मी प्रत्येक ठिकाणी पूर्ण सुरक्षेत जात आहे. मला माहिती आहे की, जे काही व्हायचं ते कितीही प्रयत्न केला तरी होणार आहे. मला वाटतं देव आहे. याचा अर्थ मी उघडपणे फिरायचं असा नाही. आता माझ्याभोवती खूप सारे शेरा आहेत. माझ्याभोवती इतक्या बंदुका आहेत की कधीकधी मलाच भीतीच वाटते".


सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करुन त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. रॉकी भाई असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा राजस्थानचा आहे. आपण गोरक्षक असल्याचा त्याचा दावा आहे. 30 एप्रिलला आपण सलमानला ठार करणार असल्याचं त्याने धमकीच्या फोनमध्ये सांगितलं होतं. 


मुंबई पोलिसांनी हा फोन कॉल जास्त गांभीर्याने घेतलेला नाही. पण अल्पवयीन मुलगा नेमका असं का वागला याची माहिती घेत असल्याचं सांगितलं होतं. तसंच याआधी 26 मार्चला सलमानला धमकीचा मेल पाठवणाऱ्या जोधपूरच्या नागरिकाला अटक करण्यात आली होती. वांद्रे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सिद्धू मूसेवालाप्रमाणे सलमानला ठार करणार असल्याचं त्याने मेलमध्ये म्हटलं होतं. सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जाहीर धमकी देण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे.