मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा 'दबंग ३' २० डिसेंबरला प्रदर्शित झाला. चित्रपटाला समिक्षकांसह, प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण चित्रपट प्रदर्शनाच्या एका दिवसांतच 'दबंग ३' ऑनलाईन लीक झाला आहे. पायरसी वेबसाइट तमिलरॉकर्सने चित्रपट ऑनलाईन लीक केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दबंग ३'ची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट चांगला चर्चेत होता. मात्र इतर चित्रपटांप्रमाणेच 'दबंग ३'लाही पायरसीचा फटका बसला आहे. 'बॉलिवूड लाईफ डॉट कॉम'ने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट ऑनलाईन लीक झाला असून अनधिकृतपणे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.


'दबंग ३'ची कमाई १५० कोटींहून अधिक होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होत होता. पण आता चित्रपट लीक झाल्यानंतर 'दबंग ३'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तमिलरॉकर्स 'दबंग ३'ची एचडी प्रिन्ट एका लिंकच्या माध्यमातून डाऊनलोड करण्याचा पर्याय देत आहे. तमिलरॉकर्सकडून केवळ 'दबंग ३'चं नाही तर इतरही बिग बजेट चित्रपट लीक करण्यात आले आहेत. 



तमिलरॉकर्सविरोधात बरेच मोठे निर्माते, दिग्दर्शक तक्रार करत असून हा मुद्दा प्रकर्षाने उचलून धरत आहेत. पण, तरीही चित्रपटांना लागलेलं पायरसीचं हे ग्रहण कमी नाही. त्यामुळे कलाविश्वाची डोकेदुखी वाढली आहे. चित्रपट बनवताना एका चित्रपटामागे अनेक लोकांची मेहनत असते. एका चित्रपटामागे कोट्यवधी रुपये लावले जातात. अशातच चित्रपट प्रदर्शनाच्या काही वेळातच तो लीक होणं हे चित्रपट निर्मात्यांसाठी मोठं नुकसानकारक ठरत आहे. चित्रपट लीक झाल्याचा थेट परिणाम त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईवर दिसून येतो.  


हिंदी, तेलुगू, मल्याळम, इंग्रजी अशा विविध भाषांतील चित्रपटांनाही तमिलरॉकर्सचा फटका बसत आहे. मुख्य म्हणजे त्यांच्याकडून बऱ्याच बनावट वेबसाइट चावलण्यात येत असल्यामुळे, वारंवार डोमेन बदलत असल्यामुळे या वेबसाईटला आळा घालणं, त्या सर्व वेबसाईट बंद करणं हेसुद्धा निर्माते, दिग्दर्शकांपुढचं आव्हानच आहे. पायरसी वाढवणाऱ्या आणि चित्रपट ऑनलाईन लीक करणाऱ्या या साइटवर सरकारने बंदी घातली आहे. मात्र तरीही तमिलरॉकर्सकडून सतत चित्रपट लीक केले जात आहेत.