मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान शुक्रवारी जोधपूर न्यायालयात हजर राहण्याची शक्यता असली तरीही त्याच्या उपस्थितीविषयी वकिलांकडून मात्र सकारात्मक उत्तर आलं नसल्याचं म्हटलं जात आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सलमानच्या उपस्थितीबाबतही त्याच्या वकिलांकडे विचारणा करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे वकिलांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सलमान या सुनावणीसाठी शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहणार नसल्याची माहिती त्यांचे वकिल महेश बोरा यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर न्यायालयाची काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


दरम्यान, सुनावणीसाठी सलमान न्यायाचलयात उपस्थित न राहिल्यास त्याचा जामीन रद्द केला जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली होती. तेव्हा आता काळवीट शिकार प्रकरणी कोणतं नवं वळण दबंग खानच्या प्रतिक्षेत आहे, याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. काळवीट शिकार प्रकरणी सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, या निर्णयानंतर त्याचा जामीन देण्यात आला होता. 


मुख्य म्हणजे या प्रकरणी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम कोठारी यांना निर्दोष ठरवण्यात आलं होतं. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात स्थानिक प्रशासनाकडून राजस्थान न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरही आता काय निर्णय येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


१९९८ मध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, या कलाकारांवरही सलमानसोबतच काळवीटाचा शिकार करण्याचा आरोप करण्यात आला होता.