`पानिपत`मधील संजय दत्तचा लूक पाहून थरकापच उडेल
त्याच्या या रुपावर खिळल्या नजरा
मुंबई : एकिकडे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर होणआऱ्या घडामोडींमध्ये संजय राऊत महत्त्वपूर्ण भूमिका मांडताना दिसत असतानाच दुसरीकडे रुपेरी पडद्यावर इतिहासातील एक युद्ध मांडण्यासाठी अभिनेता संजय दत्त हासुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहे. नावांमध्ये असणाऱ्या साम्यामुळे हे दोन्ही 'संजय' सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहेत.
आशुतोष गोवारिकर यांच्या अतिशय महत्त्वाकांक्षी अशा 'पानिपत' या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलं. युद्धभूमीच्या पार्श्वभूमीर इतिहासच बदलणाऱ्या या युद्धाची एक हलकीशी झलक पोस्टरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्यामागोमाग आता चित्रपटात अभिनेता संजय दत्त साकारत असणाऱ्या भूमिकेवरुन पडदा उचलण्यात आला आहे.
'त्याची सावली पडताच मृत्यू ओढावतो...', असं कॅप्शन देत खुद्द संजूबाबानेच ऐतिहासिकपटातील त्याचा लूक सर्वांसमोर आणला आहे. पानिपतच्या निमित्ताने संजय दत्त हा 'अहमद शाह अब्दाली'च्या रुपात सर्वांसमोर आला आहे. ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटात त्याचा लूक पाहता त्याने लिहिलेल्या कॅप्शनचा अंदाज येत आहे.
डोळ्यात सूडाची भावना, एक वेगळाच दाह अशा योद्ध्याच्या रुपातील संजय दत्तला पाहता त्याच्या भूमिकेविषयी आणि चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अभिनेत्री क्रिती सेनन या चित्रपटातून 'पार्वती बाईं'च्या भूमिकेत दिसणार आहे. तर, अर्जुन कपूर चित्रपटातील मध्यवर्ती म्हणजेच 'सदाशिवरावां'च्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं कथानक, इतिहासात असणारी त्याची नोंद आणि महत्त्वं पाहता प्रेक्षकांसाठी हा नजराणा म्हणजे परवणी ठरणार आहे. बहुप्रतिक्षित असा हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.