मुंबई : अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'कबीर सिंग' या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाकडे २०१९ मधील आतापर्यंतचा यशस्वी चित्रपट म्हणूनही पाहिलं जातं. एकिकडे या चित्रपटाची प्रेक्षकांकडून प्रशंसा होत असतानाच दुसरीकडे याच चित्रपटातून हिंसा, शिवीगाळ दाखवण्यात आल्यामुळे त्यावर टीकाही झाली. दिग्दर्शकाने चित्रपटावर होणारी ही टीकेची झोड परतवून लावली. ज्यामध्ये आता शाहिद कपूरचाही समावेश झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपूर्वीच शाहिदने चित्रपटाविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली होती, ज्यानंतर त्याने आता पुन्हा एकदा 'द इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह'मध्ये या चित्रपटावर होणाऱ्या टीकेविषयी आपलं मत मांडलं. 


चित्रपट आपल्याला काही शिकवतो की नाही, किंवा आपण त्यामधून काही शिकतो की नाही ही सर्वस्वी आपली निवड असल्याचं शाहिद म्हणाला. चित्रपट हा एक आरसा आहे, एक असा आरसा ज्यातून सत्य सर्वांसमोर ठेवलं जातं, हे सांगत 'कबीर सिंग' हा प्रौढांसाठी साकारण्यात आलेला चित्रपट होता, ज्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजतो ही बाब त्याने स्पष्ट केली. 



बिग बी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचं उदाहरण देऊन तुम्ही मला सांगताय का की, त्यांनी प्रेक्षकांना चोरी शिकवली? असा प्रश्न त्याने उपस्थित केला. तुम्ही एक चित्रपट पाहायला जाता तेव्हा तो काल्पनिक चित्रपट असतो हे तुम्हाला ठाऊक असतं ना? असं म्हणत एक समजुतदार प्रेक्षक होणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचा मुद्दा त्याने मांडला. 


'कबीर सिंग'मध्ये 'कबीर' ही मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या शाहिदला त्याच्या या भूमिकेसाठीसुद्धा अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्याचविषयी शाहिद म्हणाला, 'प्रत्येक कबीरला त्याच्या आयुष्यात एक प्रिती हवीच असते'. 


आपल्या या वक्तव्याला त्याने शाहरुखच्या 'बाजीगर' चित्रपटाचं उदाहरण देत कबीरला होणाऱ्या विरोधावर प्रश्न उपस्थित केला. 'बाजीगर' या चित्रपटामध्ये शाहरुख खान शिल्पा शेट्टीला ठार करतो. शिवाय 'संजू' चित्रपटामध्ये सोनम कपूरच्या गळ्यात कमोड सीटचं असणं यावर कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही, मग, कबीरच्या मागेच का लागले आहात? असाच सूर त्याने आळवला. 


आपल्या चित्रपटाविषयी येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून शाहिदची ही उत्तरं आणि त्यासोबत त्याने मांडलेले संदर्भ पाहता, एक कलाकार म्हणून आणि एक प्रेक्षक म्हणूनही त्याने मांडलेले हे विचार तुम्हाला विचार करायला भाग पाडणारे आहेत हे खरं.