मुंबई: 'अयैय्या सुकू सुकू....' अशी आरोळी ऐकू आली की एकच चेहरा समोर येतो. तो चेहरा म्हणजे दिवंगत अभिनेते शम्मी कपूर यांचा. हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला 'डान्सिंग सुपरस्टार' म्हणूनही या अभिनेत्याला ओळखलं जातं. एकेकाळी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर अपयशी ठरल्यामुळे चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेण्याच्या विचार असणाऱ्या शमशेर राज कपूर म्हणजेच शम्मी कपूर यांनी पाहता पाहता आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि यशाची गणितच बदलली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपूर, या प्रतिष्ठीत कुटुंबातील असणाऱ्या शम्मी यांनी आपल्या बळावर एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. 


देखणा चेहरा, भुरळ पाडेल असं स्मितहास्य आणि तितकीच दिलखेचक नृत्यशैली या गोष्टींमुळे शम्मी कपूर ओळखले जायचे. 


रुपेरी पडद्यावर विविध अभिनेत्रींसोबत त्यांची केमिस्ट्री अगदी प्रभावी होतीच. खासगी आयुष्यातही त्यांना साथ देणाऱ्या अभिनेत्री गीता बाली यांच्यासोबतही त्यांचं नातं अतिशय खास होतं. 


'कॉफी हाऊस' या चित्रपटाच्या सेटवर गीता बाली आणि शम्मी कपूर यांची ओळख झाली. ज्यानंतर त्यांनी 'रंगीन राते' या चित्रपटातही काम केलं. 



पाहता पाहता त्यांच्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. याचदरम्यान, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गीता बाली यांनी शम्मी कपूर यांचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारत आजच लग्न करावं लागणार, असं सांगितलं. 


कसंबसं एक मंदिरात जाऊन या दोघांनीही सहजीवनाचं वचन एकमेकांना दिलं. त्यावेळी गीता यांच्या भांगात सौभाग्याचं प्रतिक म्हणून भरलं जाणारं कुंकू तेथ नव्हतं. काहीच पर्याय नसल्यामुळे अखेर शम्मी कपूर यांनी लिपस्टीकनेच गीता बाली यांना कुंकू लावत आपली पत्नी म्हणून त्यांचा स्वीकार केला. 



अभिनेत्रीशी लग्न न करण्याच्या कुटुंबाच्या निर्णयाविरोधात गेल्यामुळे काही दिवस शम्मी कपूर यांना वडील पृथ्वीराज कपूर यांच्या रागाचा सामना करावा लागला होता. पण, काही दिवसांनीच त्यांचा रागही निवळला. 


लग्नानंतर काही वर्षांनी गीता बाली यांचं निधन झालं. त्यांची साथ शम्मी यांना फार काळ लाभली नाही. पत्नीच्या निधनानंतर हा डान्सिंग सुपरस्टार खचून गेला होता. पण, तरीही विविध मार्गांनी ते स्वत:ला विविध कामांमध्ये गुंतवून ठेवत असत. 



आयुष्याच्या वळणावर आलेले आघात सहन करत, अडचणींवर मात करत शम्मी खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होते आणि यापुढेही राहतील.