मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यानं हिंदी चित्रपट वर्तुळात स्वत:ची वेगळी ओखळ सातत्यानं प्रस्थापित केली. कारकिर्दीची दणक्यात सुरुवात झाल्यानंतर मधल्या काळात तो काहीसा अडचणीत दिसला. पण, त्यानंतर पुन्हा एकदा त्यानं दमदार कमबॅक केलं. सिद्धार्थच्या अभिनयानं परिपूर्ण असणारा 'शेरशाह' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परमवीर चक्र विजेत्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातून तो मध्यवर्ती भूमिकेमध्ये झळकला होता. या चित्रपटामध्ये सिद्धार्थसोबत अभिनेत्री किआरा अडवाणीसुद्धा झळकली होती. जिनं विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीची म्हणजेच डिंपल यांची व्यक्तीरेखा साकारली होती. 


चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्तानं किआरा आणि सिद्धार्थनं नुकतीच कपिल शर्माच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, त्यावेळी चित्रपटातील किसिंग सीन हा कथेचाच भाग होता की, तुम्ही तुमची कलात्मकता यात जोडलेली? असा प्रश्न कपिलनं सिद्धार्थला विचारला. 


सिद्धार्थनं याचं उत्तर देत स्पष्ट केलं की चित्रपचा 90 टक्के भाग हा मूळ घटनांवरच आधारलेला होता. तर, 10 टक्के कलात्मक स्वातंत्र्य घेण्यात आलं होतं. किआरा आणि सिद्धार्थनं दोघांनीही आपण भूमिकांना अधिक प्रभावी करण्यासाठी किस केल्याचं सांगत एका अर्थी आपल्यावर त्यासाठी जबरदस्तीच करण्यात आल्याचं सांगितलं. 


विष्णुवर्धन यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटातून कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या सैन्यदलातील कामगिरीसोबतच त्यांच्या खासगी जीवनावरही प्रकाशझोत टाकण्यात आला होता. कारगिस युद्धात शहीद झालेल्या विक्रम बत्रा यांच्या जीवनप्रवासाची ही चित्रपटरुपी झलक पाहून अनेकांचेच डोळे पाणावले होते.