मुंबई : चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारत मुख्य भूमिकेत असणाऱ्या नायकांना आव्हान देणाऱ्या अभिनेता सोनू सूद याने रुपेरी पडदा कित्येकदा गाजवला आहे. मुख्य म्हणजे लॉकडाऊनच्या काळात जिथे अनेक कलाकारांच्या नावाचा गवगवाही नाही, तिथेच अभिनेता सोनू सूद मात्र कमालीचा प्रसिद्धीझोतात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनूच्या नावाला मिळणारी ही लोकप्रियता त्याच्या अद्वितीय कार्यामुळं आहे हे मात्र नाकारता येणार नाही. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊनची हाक दिल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून विविध शहरांमध्ये स्थलांतर केलेल्या मजूर वर्गाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अशाच मजुरांसाठी सोनू एका देवदूताप्रमाणे पुढं आला. 


मुंबईत आलेल्या विविध राज्यांतील मजुरांसाठी त्याने बससेवेची व्यवस्था करत त्यांना आपल्या मुळ राज्यात पाठवण्याची सोय केली. कायद्याच्या चौकटीत राहत, रितसर परवानगी मिळवत, मजुरांच्या सुरक्षिततेची आणि अगदी प्रवासादरम्यान त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत सोनूने हे एक अनोखं नातं जपलं.


कलाविश्वात नाव कमवणाऱ्या या अभिनेत्याने उदार मनाने केलेली ही जनसेवा त्याचं वेगळेपण सिद्ध करत आहे. याच धर्तीवर त्याचं सर्वच स्तरांतून कौतुकही केलं जात आहे. इतकंच नव्हे तर काही नेटकऱ्यांनी तर थेट त्याची तुलना बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी केली आहे. 



हिंदी कलाविश्वातील या अभिनेत्याशी आपली तुलना होत असल्याचं पाहून त्यावर सोनूची विनम्र प्रतिक्रिया एक व्यक्ती म्हणून तो नेमका किती सृजनशील आहे हेच दाखवून देत आहे. 


 


लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतर दर रविवारी तुमच्या भेटीसाठी चाहत्यांची गर्दी होणार, तेव्हा सुट्टीच घ्या तुम्ही  असं सांगणाऱ्या आणि बच्चन यांच्याशी तुलना करणाऱ्या एका युजरला उत्तर देत सोनूने मजुर आणि चाहते आपल्या भेटीला येण्यापेक्षा मीच त्यांच्या घरी जाणार असल्याचं स्पष्ट केलं. यशाच्या शिखरावर असणाऱ्या या अभिनेत्यानं फक्त सामाजिक बांधिलकीचं भानच ठेवलं नाही, तर त्याने समाजातील घटकांसोबत असणाऱ्या नात्याला खऱ्या अर्थानं एक वेगळा आकार दिला हेच खरं.