मुंबई : अनेकदा आयुष्यात असे काही प्रसंग येतात जे आपली खऱ्या अर्थानं परीक्षा घेत असतात. असाच एक प्रसंग अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जीवनातही आला होता. रविवारी सुशांतनं आत्महत्या करुन जीवन संपवल्यानंतर त्याच्या खासगी आयुष्यापासून ते अगदी करिअरपर्यंतच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत, ज्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. 
सुपरहिट चित्रपटापासून ते अपयशी चित्रपटापर्यंत सारंकाही पाहिलेल्या सुशांतला संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात काम करण्याचीही संधी होती. योगायोगानं ही संधी त्याला मिळाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर भन्साळी 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट करीना आणि सलमानच्या साथीनं साकारू इच्छित होते. करीनानं मस्तानीसाठी लूक टेस्टही दिली होती. पण, पुढं सलमाननं या भूमिकेसाठी स्वारस्य दाखवलं नाही. हा चित्रपट कोणा दुसऱ्या अभिनेत्यासह साकारावा हा विचार भन्साळींच्याही मनात आला. 


सुशांत भन्साळी भेट .....
सुशांतनं त्या दिवसांमध्ये यशराज फिल्म्ससह तीन चित्रपटांचा करार केला होता. त्यापैकी शुद्ध देसी रोमांस हा चित्रपट साकारण्यात आला होता. भन्साळी यांच्या मते उंच, सावळा आणि परखड व्यक्तीमत्त्वं असल्याप्रमाणे चेहरेपट्टी असणारा सुशांत बाजीराव पेशव्यांच्या भूमिकेसाठी योग्य असेल. त्या धर्तीवर भन्साळी आणि सुशांतची भेट झाली. त्याचं एक स्वप्नच साकार होऊ पाहत होतं. आवडत्या दिग्दर्शकासोबतच आवडत्या अभिनेत्रीसमवेत काम करण्याची संधी त्याला मिळाली होती. 


सुशांतनं नकार का दिला...
सुशांत याआधीच काही दिवसांपूर्वी शेख कपूर यांना भेटला होता. त्यांच्या अतिशय महत्त्वाकांक्षी 'पानी' या प्रोजेक्टवर ते त्यावेळी काम करत होते. पण, या चित्रपटासाठी सुशांतने त्याच्या करिअरमधील एक- दोन वर्षे देण्याची कपूर यांची अट होती. त्यांचा सुशांतवर इतका प्रभाव होता की तो यासाठी लगेचच तयारही झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाची ऑफर स्वीकारत सुशांतनं त्यायसाठीची तयारीही सुरु केली. त्याचदरम्यान जेव्हा भन्साळींनी त्याच्यापुढं प्रस्ताव ठेवला तेव्हा सुशांतनं त्यांना सत्य सांगितलं. कपूर यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतरच आपण बाजीराव मस्तानी करणार असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. भन्साळींना सुशांतचा हा स्पष्टवक्तेपणा आवडला. पण, त्यांना या चित्रपटाची सुरुवात लगेचच करायची होती. त्यामुळं सुशांतनं त्याची बाजू सांगताच भन्साळींनी रणवीर सिंगला या चित्रपटासाठी निवडलं. 


 


'पानी' कधीच साकारला नाही
सुशांत वाट पाहत राहिला आणि या चित्रपटाचं चित्रीकरण कधी सुरुच होऊ शकलं नाही. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट साकारला जाणार होता. ज्याची निर्मिती हॉलिवूडमधील निर्मात्यांकडून होणार होती. पण, आर्थिक कारणांनी या चित्रपटाची गाडी अडली, त्यानंतर संहितेत बदल झाले. पण, दोन वर्षांनंतर कुद्द कपूर यांनीच या चित्रपटाचा गाशा गुंडाळला. 


सुशांतने गमावल्या अनेक संधी 
कपूर यांच्या या चित्रपटापायी सुशांतचं अनेक चांगल्या चित्रपटांचे प्रस्ताव नाकारले. कैक मोठ्या चित्रपटांसाठी त्याची निवड करण्यात येणार होती. अनेकदा त्याच्या भूमिका रणवीरला गेल्या किंवा अर्जुन कपूरला. पण, 'पानी' न साकारला जाण्याविषयी विचारलं असता दोन वर्षे शेखर कपूर यांच्यासमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळाली ती कोणत्याही सुपरहिट चित्रपटाहून कमी नव्हती अशीच प्रतिक्रिया तो देत असे.