SSR Case : कुटुंबाचा इशारा, सुशांतविषयी वेडंवाकडं प्रसिद्ध कराल तर...
जो आरोप लावला जात आहे की...
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणीचा तपास सीबीआयकडून सुरु असतानाच आता त्याच्या वडिलाच्या वकिलांनी त्याच्या कुटुंबाची बाजू माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे. एका पत्रकार परिषदेत विकास सिंह यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडत सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही त्याच्या आयुष्यात आल्यानंतरच त्याचं मानसिक स्थैर्य ढासळल्याचा मुद्दा अधोरेखित केला.
सुशांत सिंह राजपूतची कोणतेही लाइफ इन्शुरन्स पॉलिसी नव्हती. त्यामुळे जो आरोप लावला जात आहे की आत्महत्या असल्यास इन्शुरन्स चा मोबदला मिळत नाही , हा आरोप सुशांत सिंगचे वकील विकास सिंग यांनी खोडून काढला.
विकास सिंह यांनी यावेळी माध्यमांमध्ये चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात येणाऱ्या काही मुद्द्यांवर कटाक्ष टाकत सुशांतच्या कुटुंबाच्या वतीनं संबंधित वृत्तवाहिन्यांना इशारा दिला. सुशांतच्या तीन बहिणी आणि त्याचे वडील यांच्याविषयी काही ठिकाणी चुकीची आणि नकारात्मक माहिती दाखवण्यात येत आहे. शिवाय यामध्ये सुशांतच्या मानसिक आरोग्यावरही भाष्य करण्यात येत आहे, ही बाब त्यांनी मांडत नाव न घेता काही वाहिन्यांवर निशाणा साधला.
शिवाय सुशांत आणि त्याच्या कुटुंबाबत काहीही चुकीचं प्रसिद्ध करणाऱ्यांविरोधात रितसर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. सुशांतचे वडील आणि त्याच्या बहिणींनी मिळून घेतलेल्या निर्णयानुसार कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय त्याच्या जीवनावर आधारित पुस्तक, मालिका किंवा चित्रपट लिहिला किंवा साकारला जाऊ शकत नाही. असं करण्यापूर्वी स्क्रीप्ट हे सुशांतच्या कुटुंबीयांना दाखवणं अपेक्षित असेल हे विकास सिंह यांनी स्पष्ट केलं. सुशांतच्या कुटुंबानं घेतलेल्या या निर्णयाविरोधात कोणीही जाण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर हे पाऊल उचलावं असं म्हणत भविष्यातील अडचणींबाबत त्यांनी काहींना सजग केलं.
तपासाशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास सिंह यांनी यावेळी स्पष्ट नकार दिला. तर, रिया चक्रवर्ती ही सुशांतची प्रेयसी त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासूनच त्याचं मानसिक संतुलन बिघडलं हा मोठा खुलासा त्यांनी केला. सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिलेली ही माहिती पाहता आता या प्रकरणी सुरु असणाऱ्या अवाजवी चर्चा शमणार का, हाच प्रश्न उपस्थित होत आहे.