मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं आपल्या कौशल्याच्या बळावर कोणाचाही वरदहस्त नसताना बॉलिवूडमध्ये स्थान मिळवलं. अभिनेता म्हणून रुपेरी पडद्यावर स्वत:ला सिद्ध करणारा सुशांत बुद्धिमत्तेच्या बाबतीतही भल्याभल्यांना मागे टाकेल असाच होता. अभियांत्रीकीसाठीच्या प्रवेश परीक्षेत त्याला सातवं स्थान मिळालं होतं. इतकंच नव्हे, तर नॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाडमध्येही त्यानं यश संपादन केलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनयाव्यतिरिक्त अंतराळ, नवं तंत्रज्ञान यामध्येही त्याला कमालीचा रस होता. आपल्या मुळ गावातून बाहेर पडल्यानंतर सुशांतनं कधी मागे वळून पाहिलं नाही. असा हा अभिनेता आणखी एका क्षेत्रातही बऱ्यापैकी सक्रिय होता अशी माहिती समोर येत आहे. 'बॉलिवूड लाईफ'च्या वृत्तानुसार मागील दोन वर्षांमध्ये सुशांतनं त्याच्या तीन कंपन्यांची सुरुवात केली होती. 


आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, व्हर्च्युअल रिऍलिटी, मिक्स रिऍलिटी, कॉम्प्युटर सायन्स, हेल्थ प्रमोशन, स्वच्छता, कुपोषण अशा क्षेत्रांमध्ये या कंपन्या महत्त्वाचं योगदान देत आहेत. २०१८ मध्ये सुशांतनं इंसाएई वेंचर ही त्याची पहिली कंपनी सुरु केली होती. चित्रपट, आरोग्य कल्याण आणि संशोधनात ही कंपनी कार्यरत आहे. 


सुशांतची दुसरी कंपनी आहे विविड्रेज रेलीटॅक्स. त्याची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती ही या कंपनीशी जोडली गेल्याचं म्हटलं जात आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती या कंपनीच्या संचालक मंडळातील एक सदस्य आहे. २०१९ मध्ये सप्टेंबर महिन्यात त्यानं ही कंपनी सुरु केली होती. सुशांततनं त्याची तिसरी कंपनी २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यात सुरु केली होती. समाजसेवेत योगदान देण्यासाठी म्हणून त्यानं ही कंपनी सुरु केली होती. 


 


कलाविश्वाच्या सीमा ओलांडून सातत्यानं चौकटीबाहेरचे विचार करणाऱ्या सुशांतला कायमच अनेकांना हेवा वाटत होता. पण, आयुष्याच्या या प्रवासात असं एक वळण आलं ज्यानं सारं चित्र बदललं आणि होत्याचं नव्हतं झालं. असा हा अभिनेता त्याच्या सामाजिक भानामुळं, चाहत्यांमधील स्थानामुळं आणि अर्थातच कलाकृतींमुळं कायमच सर्वांच्या स्मरणात राहील.