मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यांनं काही दिवसांपूर्वीच त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतचं अशा पद्धतीने आयुष्य संपवण्यासाठी पाऊल उचचणं हे सर्वांनाच हादरवणारं होतं. हादरवण्यापेक्षा त्याच्या निधनामुळं कलाविश्वाचा एक वेगळा चेहरा पुन्हा एकदा अनेक प्रश्नांना वाव देऊन गेला. त्यातच आता आणखी भर टाकत आहेत ते म्हणजे काही मेसेज आणि कलाकार मित्रांशी सुशांतनं साधलेल्या संवादाचे पुरावे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुपेरी पड्यावर क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याची व्यक्तीरेखा अतिशय प्रभावीपणे साकारणाऱ्या सुशांतला यशाच्या शिखरावर असतानाही आपल्या प्रवासातील अडचणीच्या काळाचा विसर पडला नव्हता. किंबहुना या कलाविश्वात त्याला अद्यापही वेगळेपणाचीच जाणीव होत होती. 


'टेलिव्हिजन विश्वातून चित्रपटांकडे वळणं कठीण होतं. पण, मी माझ्या (चित्रपटांच्या) निवडीमुळं, निर्णयक्षमतेमुळं तग धरु शकलो', असं सुशांत आघाडीची डान्सर आणि अभिनेत्री  Lauren Gottlieb हिला म्हणाला होता.  
खुद्द  Lauren Gottliebनेच सोशल मीडियावर सुशांतसोबतच झालेल्या या संभाषणाचे स्क्रिनशॉट पोस्ट केले. त्यादरम्यान सुशांत बुडापेस्टमध्ये चित्रीकरण करत होता. एव्हाना धोनीच्या जीवनावर साकारणाऱ्या चित्रपटाचं चित्रीकरण त्यानं संपवलं होतं. कलाविश्वात कोणाचाही वरदहस्त नसूनही तग कसा धरता येत आहे, या मुद्द्यावर या दोघांची त्यावेळी चर्चा झाल्याचं मेसेज वाचून लक्षात येत आहे. 


सुशांतसोबत आपण एका वेगळ्याच नात्यात बांधलो गेलो असल्याचं म्हणत आपणही त्याच्याच प्रमाणे या कलाविश्वात आल्याची भावना लॉरेननं व्यक्त केली. त्याच्यासोबत झालेल्या गप्पा आज मन हेलावून गेल्या असं म्हणत तिनं सुशांतच्या सच्चेपणाची दाद दिली . दरम्यान, तिनं शेअर केलेले हे स्क्रीनशॉट पाहता कलाविश्वाचं दिसणारं झगमगणारं रुप पाहून हेवा वाटणाऱ्यांपुढं एक वेगळं आणि तितकंच धक्कादायक चित्र समोर येत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 



 


दरम्यान, २०१९ मध्ये 'छिछोरे' या चित्रपटानंतर सुशांतकडे बऱ्याच बड्या निर्माते- दिग्दर्शकांनी पाठ फिरवल्याची धक्कादायक माहितीही या चर्चांमध्ये समोर येत आहे. एकंदरच कारकिर्दीमध्ये यशाची शिखरं गाठल्यानंतरही अपयशाच्या वाटेवर नकळतपणे हरवलेल्या या अभिनेत्याच्या निधनानं अनेक अनुत्तरित प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.