मुंबई : नुकतंच अमेरिकेहून भारतात परतलेल्या अभिनेता Sushant Singh Rajput सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणीनं नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. ही पोस्ट तिनं अवघ्या एका दिवसातच डिलीटही केली. या पोस्टसोबत तिनं सुशांतनं तिच्यासाठी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेलं एक पत्रही जोडलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती ही पाटण्यामध्ये तिच्या कुटुंबाला धीर देत आहे. आपल्या भावावर नितांत प्रेम करणाऱ्या बहिणीनं तिच्या भावनांना वाट मोकळी करुन देत लिहिलं, 'मला ठाऊक आहे, तू फार अडचणीत होतास. तू अतिशय धीरानं या संघर्षाला सामोरं जात होतास. मला ठाऊक आहे. माझ्या सोन्या या वेदनेतून तुला जावं लागलं यासाठी मी तुझी क्षमा मागते. माझ्याने शक्य असतं तर तुझ्या या सर्व वेदना मी माझ्याकडे घेतल्या असत्या आणि माझा आऩंद तुला दिला असता', असं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं. 


सुशांतसाठीच्या भावना व्यक्त करणाऱ्या त्याच्या बहिणीचे शब्द इतक्यायवरच थांबले नाहीत. तिनं पुढे लिहिलं, 'तुझ्या या लकाकणाऱ्या डोळ्यांनी साऱ्या जगाला स्वप्न पाहायला शिकवलं. तुझ्या स्मितहास्यानं हृदयाचा खरेपणा सर्वांपर्यंत आणला. तुझ्यावर आमचं प्रेम असंच कायम असेल. तू जिथं कुठं असशील तिथं आनंदात राहा. संतुष्ट राहा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव आम्हा सर्वांचं तुझ्यावर फार प्रेम आहे. तुझ्यावर सारे नि:स्वार्थ प्रेम करतात'. 


 



आपल्या भावासाठी भावना व्यक्त करणाऱ्या श्वेतानं या प्रसंगी तिच्या कुटुंबासमवेत उभ्या असणाऱ्या प्रत्येकासाठीही महत्त्वाचा संदेश लिहिला. सध्याची परिस्थिती ही कठिण आणि परीक्षा पाहणारी असली तरीही यामध्ये मनाचा कोंडमारा होऊ देऊ नका, असं तिनं लिहिलं. सोशल मीडियावर बहीण- भावाच्या नात्याचे हे बंध अनेकांच्याच डोळ्यात पाणी आणून गेले.