`ते दहशतवादी नव्हे, विद्यार्थी आहेत`, जामिया प्रकरणी बॉलिवूडकरांचा संताप
अनुराग कश्यपच्या पोस्टने वेधलं अनेकांचं लक्ष...
मुंबई : रविवारी jamia millia islamia जामिया मिल्लिया इस्लामिया इस्लामिया विद्यापीठाच्या प्रांगणात CAA नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निषेधार्थ निदर्शनं काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमाराचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. सर्वच स्तरांतून सत्ताधारी पक्ष आणि पोलिसांच्या भूमिकेवर टीका करण्याचं सत्र सुरु झालं आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला आणि त्यांना दिलेली वागणूक पाहता हे सारंकाही निराशाजनक असल्याचं म्हणत बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींनीसुद्धा या मुद्द्यावर पुढे येत मतप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ, फोटो आणि लिखित स्वरुपात कलाकारांनी त्यांच्या ठाम भूमिका मांडल्या.
हे विद्यार्थी आहेत दहशतवादी नाहीत, असं म्हणत अभिनेता झिशान आयुब याने या घटनेमध्ये विद्यार्थ्यांची बाजू घेतली. तर, आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या घटनेवर चिंतेचा सूर आळवत दिग्दर्शिक अलंकृता श्रीवास्तव यांनी ट्विट केलं. शांततेच्या मार्गाने निदर्शनं करणाऱ्या नागरिकांना अशा प्रकारे हिंसेचा सामना करावा लागणं हे योग्य नसल्याचं म्हणत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यानेही त्याचं मत मांडलं.
'देशातील परिस्थितीमुळे सर्वांनी शरमेनं मान खाली करावी'
अभिनेत्री परिणीती चोप्रानेही ट्विटरवर तिचा संताप व्यक्त केला. ‘देशात लोकशाही आहे असं म्हणणं आता बंद करायला हवं, अशा शब्दात तिने निषेध नोंदवला. तर मी कोणत्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन करत नाही आणि मुळात हिंसा योग्यच नाही असा मुद्दा रितेश देशमुखने उचलून धरला.
दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप याने केलेली सोशल मीडिया पोस्ट या साऱ्यामध्ये बरंच काही सांगून गेली. अनुरागच्या या पोस्टमध्ये त्याने कोणतंही कॅप्शन लिहिलेलं नाही. पण, पोस्ट केलेला फोटोच सारंकाही सांगून जात आहे. देशात भाजप सरकारचा वाढता प्रभाव आणि त्यामुळे घडणाऱ्या घटना याकडे झुकणारा फोटो त्याने पोस्ट केला. ज्यामध्ये भारताचा राष्ट्रध्वज दिसत आहे. यामधील केशरी रंगाचं प्रमाण जास्त दिसत आहे. तर, हिरव्या रंगाचं प्रमाण हे अधिक कमी दर्शवण्यात आलं आहे. शांततेचं प्रतिक असणाऱ्या सफेद रंगालाही यामध्ये कमी प्राधान्य दिलं असून, अशोक चक्ररुपात एक व्यक्ती दिसत आहे, जो केशरी रंगाखाली दबला जात आहे. देशाच्या परिस्थितीवर हे चित्र अचूकपणे भाष्य करत असल्याचं अनुरागने सर्वांपुढे मांडलं आहे.
सर्वच स्तरातून उमटणाऱ्या या प्रतिक्रिया आणि त्याचे राजकीय पटलावर होणरे सर्व परिणाम नेमके काय असणार हे येत्या काळात स्पष्ट होतील. तूर्तास देशाच उसळलेला आगडोंब थांबलाच पाहिजे ही मागणी आता प्रकर्षाने मांडण्यात येत आहे.