`छावा` चित्रपटाचे सीन शूट करताना जखमी झाला विकी कौशल, आता धक्कादायक व्हिडीओ आला समोर
`छावा` हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
Vicky Kaushal Injured : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. विकीने अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. विकी कौशल हा उरी – द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला. या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. सध्या विकी कौशल हा त्याचा आगामी 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्याला दुखापत झाली आहे. त्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून 'छावा' या चित्रपटासाठी जोरदार तयारी करत आहेत. सध्या तो या चित्रपटाच्या एका अॅक्शन सीनचे शूटींग करत आहे. याच अॅक्शन सीनचे शूटींग करतेवेळी तो जखमी झाला आहे. विकी कौशलचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत तो त्याच्या गाडीतून उतरताना दिसत आहे. यावेळी त्याच्या डाव्या हाताला प्लॅस्टरची पट्टी बांधल्याचे दिसत आहे. तो या गाडीतून खाली उतरुन घरी जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
विकी कौशलच्या हाताला दुखापत
विकी कौशलच्या हाताला दुखापत झाल्याने पुढचे काही दिवस शूटींग रद्द करण्यात आले आहे. तो काही दिवस विश्रांती घेणार आहे. त्याचा हात पूर्णपणे बरा झाल्यानंतर तो पुन्हा या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात करेल, असे बोललं जात आहे. विकीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक चाहते हे त्याच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्याला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
लक्ष्मण उतेकर करणार दिग्दर्शन
दरम्यान विकी कौशल हा लवकरच ‘छावा’ या चित्रपटात झळकणार आहे. 'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. यासाठी त्याने त्याचा लूकही बदलला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन करत आहेत. तर चित्रपटाचे लेखन ऋषी विरमणी यांनी केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकरही झळकणार आहे.
याआधी विकी कौशल हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात झळकला होता. यात विकी कौशल – सारा अली खान यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर विकी कौशल आणि लक्ष्मण उत्तेकर पुन्हा एकमेकांसोबत काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘छावा’चे चित्रीकरण सुरू असतानाच विकी कौशल हा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या यशराज प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही व्यस्त आहे.