मुंबई : 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात खुद्द मोदींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विवेक ओबेरॉय याने राजकारणात प्रवेश करण्यासंबंधी लक्षवेधी वक्तव्य करत सर्वांना धक्काच दिला. य़ेत्या काळात राजकारणात प्रवेश केल्यास आपण वडोदरा येथील मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं विवेक म्हणाला. 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तो बोलत होता. याचवेळी त्याने राजकीय कारकिर्द आणि त्यात आपला सहभाग याविषयीही वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी राजकारणात प्रवेश केला तर, २०२४ मधील निवडणुकांसाठी मी वडोदरा मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छितो', असं विवेक म्हणाला. मोदी ज्यावेळी या मतदार संघातून निवडणूक लढले होते, त्यावेळी त्यांना मतदारांकडून मिळालेलं प्रेम आणि प्रतिसाद या गोष्टींमुळेच आपणल्यालाही या मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचं त्याने स्पष्ट केलं. 


ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी विवेक पारुल विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात पोहोचला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्याने या आशयाचं वक्तव्य केलं. सध्याच्या घडीला विवेकच्या 'पीएम नरेंद्र मोदी' या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वाटेतील अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसल्या तरीही शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याच्या बाबतीत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिला होता. 


लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. निवडणूक आयोगापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत या चित्रपटाचं प्रकरण पोहोचलं असून, राजकीय पटलाप्रमाणेच कलाविश्वातही निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत, असंच म्हणावं लागेल.