मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीवर आणि त्यांच्या एकंदर जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा चित्रपट पीएम मोदी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. पण, या चित्रपटाला विरोधी पक्षाकडून होणारा विरोध हा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांनीही या चित्रपटाविरोधात नाराजीचा सूर आळवत त्याचा विरोध करणं सुरूच ठेवलं आहे. पण, त्यांच्या या एकंदर भूमिकेत फक्त आणि फक्त वेळच वाया जात असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अभिनेता विवेक ओबेरॉय याने दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएनआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्याने आपली प्रतिक्रिया दिली. वरिष्ठ आणि नावाजलेले वकीलच चित्रपटाविरोधात याचिका दाखल करत त्यांचा वेळ का वाया घालवत आहेत, असा प्रश्न विचारत विवेकने अभिषेक सिंघवी आणि कपिल सिब्बल यांच्या नावांचा उल्लेख केला. एका सरळ, साध्या चित्रपटाला विरोध का होत आहे, यांना चौकीदाऱ्याची भीती वाटते का, असं वक्तव्य करत विवेकने सर्वांचच लक्ष वेधलं. मोदी हे स्वत: अनेक बाबतीत एक आदर्श असून, त्यांचीच यशोगाथा या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर आणणार असल्याचं विवेकने स्पष्ट केलं. 




ओमंग कुमार दिग्दर्शित 'पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट ५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू असतेवेळी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी करण्यात येत होती. पण, सध्याच्या घडीला या चित्रपटाच्या वाटेतील अडथळे दूर झाल्याचं पाहायला मिळत असून, मोदींचा एका सर्वसामान्य व्यक्तीपासून देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यापर्यंतचा प्रवास पाहता येणार आहे. शिवाय पंतप्रधान पदावर असतानाची त्यांची कामगिरीही चित्रपचटातून अधोरेखित करण्यात येणार आहे.