Amrita Rao Pregnancy : असं म्हणतात की, मातृत्त्वाचा टप्पा एका महिलेला दुसऱ्यांदा आयुष्य जगण्याची संधी देतो. कारण, हा तोच टप्पा असतो जिथं महिला स्वत:ला, स्वत:च्या शरीराला नव्यानं ओळखू लागते. हा टप्पा असतो एका नव्या जीवाला जन्म देण्याचा. पण, धकाधकीचं आयुष्य त्यातच विस्कटलेली जीवनशैलीची घडी या साऱ्यामुळं अनेकजणींना मातृत्त्वाच्या सुखापासून वंचित राहावं लागतं. प्रयत्नही यापुढे फिके पडतात पण, यश काही हाती लागत नाही. अनेकजणींनी ही कैफियत ऐकली असेल, किंबहुना तिचा सामनाही केला असेल. निसर्गाच्या या लीलेपुढं श्रीमंतीसुद्धा फिकी पडते. विश्वास बसत नाहीये? लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या आणि सधन कुटुंबातून आलेल्या एका अभिनेत्रीनं याविषयी बोलताना स्वत:चच उदाहरण दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री म्हणजे अमृता राव. गेल्या काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असणारी अमृता सध्या मात्र तिच्या युट्यूब चॅनलमुळं प्रकाशझोतात आली आहे. इथं ती आणि तिचा पती RJ अनमोल त्यांच्या नात्याचे विविध पैलू उलगडताना दिसत आहेत. याच दरम्यान तिनं गरोदरपणापासून मातृत्त्वापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासातील अडथळे वस्तूस्थितीसह सर्वांपुढे मांडली. आयव्हीएफ आणि सरोगसी या गोष्टी पर्याय म्हणून कितीही सोप्या वाटत असल्या तरीही त्यातही अपयश येऊ शकतं ही बाब तिनं अधोरेखित केली. 


बाळाच्या जन्मासाठीचे प्रयत्न आणि अपयश... 


अमृता आणि तिचा पती अनमोल या दोघांनीही चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर बाळाचा जन्म झाल्याचं सर्वांना सांगितलं. 2016 ते 2020 या दरम्यानच्या काळात त्या दोघांनीही बाळासाठी प्रयत्न केले. पण, अडथळे काही थांबण्याचं नावच घेईना. सरतेशेवटी त्या दोघांच्याही सहनशक्तीचा बांध तुटला, ते दोघंही खचले. स्त्रीरोगतज्ज्ञांची मदत घेत बरीच वर्षे त्यांनी सातत्यानं आययुआय, सरोगसी आणि आयव्हीएफसारखे पर्याय हाताळले. आयुर्वेदाची मदत घेतली. पण, सर्वकाही अपयशी ठरत होतं. नैसर्गिक गर्भधारणा होत नसल्यानं अमृतानं आयव्हीएफ पर्याय अवलंबला, तिथंही अपयश. पुढे तिनं सरोगसीकडे मोर्चा वळवला. पण, सरोगसीत मदक करणाऱ्या महिलेचाच गर्भपात झाला. इथं अमृता आणि तिच्या पतीचा आत्मविश्वास कोलमडला. आता बाळ हवंय की नकोय? याच प्रश्नावर ते दोघं पोहोचले होते. 


हेसुद्धा पाहा : आलिशान महालाहून कमी नाहीत Indian Railway च्या 'या' ट्रेन; तिकीट दर माहितीयेत? 


नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. कारण, 2020 मध्ये अमृताला गर्भधारणा झाली आणि तिनं पुढे एका मुलाला जन्म दिला. हे सर्वकाही चमत्कारी होतं. कारण, इतक्या अपयशानंतर काही गोष्टींचा पाठलाग करणं त्या दोघांनीही सोडून दिलं होतं. पण, आपल्या या प्रवासातून अमृतानं असंख्य महिलांना परिस्थिती काहीही असो, धैर्यानं पुढे जा, जिद्द आणि सकारात्मकता सोडू नका असाच संदेश दिला. मूल होत नाही, या विचारानं अनेक महिला खचतात, पती- पत्नीच्या नात्यात दुरावाही येतो. पण, एकमेकांची साथ देत आणि एकमेकांचा आधार होत परिस्थितीला सामोरं गेल्यास आव्हानं आपोआपच मागे हटत जातात हेच अमृता आणि अनमोलच्या या अनुभवातून सर्वांच्याच लक्षात आलं.