मुंबई : अभिनेत्री, व्यावसायिक, सूत्रसंचालिका अशा विविधझ रुपांमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या मंदिरा बेदी हिने कायमच तिच्या प्रत्येक कृतीच्या माध्यमातून इतर महिलांपुढे आदर्श ठेवला आहे. अनेक तरुणींसाठी मंदिरा कायमचत प्रेरणास्त्रोत ठरली आहे. फक्त कलाजगतातील कारकिर्दच नव्हे, तर वैवाहिक जीवन आणि मातृत्वाच्या निर्णयांमध्येही तिने कायमच समतोल राखला. असं असलं तरीही मंदिराला यापैकीच एक निर्णय आजही कठिण असल्याची जाणीव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आएएनएस' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना मंदिराने तिच्या जीवनातील या टप्प्याविषयी सांगितलं. 'एक महिला म्हणून भारतीय समाजात वावरत असताना तुम्हाला अनेक समजुतींना सामोरं जावं लागतं. कामाच्या काही कारणांनी मी ज्यावेळी मातृत्त्व, गरोदरपणाला उशीर केला तेव्हा मला जीवनातील सर्वाधिक कठिण निर्णय घ्यावा लागला होता. माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. करिअरला प्राधान्य देणारी महिला म्हणून माझ्याकडे पाहिलं जात होतं', असं मंदिरा म्हणाली. 


इतरांचा आपल्याप्रती असा दृष्टीकोन असणं ही चांगली बाब असली तरीही विवाहित महिलेविषयी पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन एकंदरच वेगळा आहे हे खरं ही बाबही तिने अधोरेखित केली. मुलाच्या जन्मानंतरही खासगी आणि व्यावसायिक जीवनात आपण विभागलो गेलो होतो, असंही तिने यावेळी स्पष्ट केलं. 


एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलणाऱ्या मंदिराने यावेळी पतीचेही आभार मानले. राज कौशलशी लग्नबंधनात अडकल्यानंतर त्याचा पाठिंबा आणि साथही आपल्यासाठी तितकीच महत्त्वाची असल्याचं तिने सांगितलं. मुलाचं संगोपन करण्यापासून ते, कोणत्याही गोष्टीत साथ देईपर्यंत प्रत्येत ठिकाणी पतीची साथ मिळाल्याबद्दल आपल्याला हा एक मोठा दिलासा होता, असं तिने स्पष्ट केलं. 



प्रत्येक विवाहितेसाठी तिने एक महत्त्वाचा संदेशही दिला. समाजाच्या वृत्तीवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा स्वत:वर आणि स्वत:मधील कौशल्यांवर विश्वास ठेवा असा संदेश तिने सर्वांना दिला. करिअरच्या आजच्या ज्या टप्प्यावर आपण आहोत तिथवर पोहोचण्यासाठी आपण बराच संघर्ष केला असून, त्याचा प्रचंड अभिमान असल्याचंही मंदिराने न विसरता सांगितलं.