मुंबई : विनोदवीर कपिल शर्मा याने काही दिवसांपूर्वीच त्याची प्रेयसी गिन्नी छतरथ हिच्याशी लग्नगाठ बांधली. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकल्यानंतर कपिलने त्याच्या सेलिब्रिटी मित्रांसाठी एका स्वागत सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी अभिनेत्री रेखा यांच्यापासून नवविवाहित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची उपस्थिती पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल आणि गिन्नीला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेल्या प्रत्येक कलाकाराने यावेळी स्वागतसोहळ्यात धमाल केल्याचं पाहायला मिळालं. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ पाहता रणवीर आणि दीपिकानेच खऱ्या अर्थाने कल्ला केल्याचं म्हणायला हरकत नाही. 



पार्टी किंवा कोणाच्या लग्नाचं रिसेप्शन, कोणत्याही कार्यक्रमात रणवीर सिंगने हजेरी लावली की, तो संपूर्ण वातावरणच बदलतो, हे खंर. कपिलच्या स्वागत सोहळ्यातही त्याची जादू पाहायला मिळाली. यावेळी त्याला साथ मिळाली ती म्हणजे पत्नीची, अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची. 




गायक मिका सिंग गात असतानाच रणवीरने त्याला गाण्य़ात साथ दिली आणि रणवीरला साथ देण्यासाठी व्यासपीठावर आली त्याची लाडकी पत्नी, दीपिका. रणवीर गाणं म्हणत असताना दीपिका, कपिल आणि गिन्नीसुद्धा त्यावर ठेका धरताना पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रणवीर आणि दीपिकाचे असे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये ते सेलिब्रिटी पार्टीचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहेत. त्यामुळे पार्टी कोणाचीही असो, कार्यक्रम कोणताही असो कल्ला रणवीर - दीपिकाच करणार आणि चर्चाही त्यांचीच होणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.