मुंबई : सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी जोड्यांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या काही नावांमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या नावांचाही समावेश होतो. किंबहुना ही जोडी या यादीत अग्रस्थानी आहे, असं म्हणायला हरकत नाही. दीपिका आणि रणवीर यांनी आतापर्यंत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'राम लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. तर, 'फाईंडिग फॅनी' या चित्रपटातही रणवीर दीपिकासह पाहुणा कलाकार म्हणून झळकला होता. पण, यापैकी कोणत्याही चित्रपटाचा शेवट काही गोड झाला नाही. दीपिका आणि रणवीरला रुपेरी पडद्यावर विरह सहन करावा लागलाच. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका आणि रणवीरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहता ही बाब अनेकदा चाहत्यांनाही निराश करते. पण, नात्यांचं हे अनोखं समीकरण आणि दुराव्याचं, विरहाचं हेच गणित आता सुटणार आहे. कारण, येत्या काळात रणवीर आणि दीपिका हे कबीर खान दिग्दर्शित '८३' या चित्रपटातून झळकणार आहेत. 'पिंकव्हिला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या चित्रपटासाठी दीपिकाची निवड करण्यात आली आहे. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्चचषकाच्या यशोगाथेवर या चित्रपटाचं कथानक आधारलेलं असणार आहे. रणवीर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे, जेथे तो कपिल देव यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येईल. तर, दीपिकाही चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. असं म्हटलं जातं की, ज्यावेली विश्वचषकाचा सामना सुरु होता तेव्हा भारताचा संघ हरताना पाहून रोमी स्टेडियममधून बाहेर  गेल्या होत्या. पण, संघ सामन्यात परतल्याचं कळताच त्या पुन्हा स्टेडियममध्ये आल्या होत्या. आता हे सर्व प्रसंग चित्रपटातही साकारण्यात येणार असल्यामुळे लग्नानंतर ऑनस्क्रीन पती- पत्नीच्या भूमिकेत खऱ्याखुऱ्या आयुष्यातील ही जोडी नेमकी काय किमया करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.