रणवीर- दीपिका नेमके आहेत तरी कुठे?
फोटो पाहून साऱ्यांनाच पडला प्रश्न
मुंबई : आगामी चित्रपट, जाहिराती आणि अनेक कार्यक्रम या साऱ्यांचा व्याप, सततचं चित्रीकरण आणि चाहत्यांची गर्दी अशा एकंदर वातावरणातून काही वेळ काढत अभिनेत्री दीपिका पदुकोण ही एका खास व्यक्तीसोबत सुट्टीवर गेली आहे. ही खास व्यक्ती म्हणजे अर्थातच दीपिकाचा पती, रणवीर सिंग.
कामाच्या व्यापातही दीपिका आणि रणवीर कायमच त्यांच्या नात्यालाही केंद्रस्थानी ठेवतात. विवाहित आयुष्यात काम आणि वैयक्तिक जीवनात सुरेख असा ताळमेळ साधणारी ही जोडी आता याच कामाच्या व्यापापासून काहीशी दूर गेली आहे.
बॉलिवूडची ही स्टार जोडी नेमकी कुठे गेली आहे, हे कोणासही ठाऊक नाही. पण, त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून मात्र चाहत्यांनी आपआपल्या परिने याबाबत अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे.
दीपिकाच्या सोशल मीडिया पोस्ट पाहता, ही जोडी समुद्रकिनारी असणाऱ्या एका नयनरम्य ठिकाणी गेल्याचं कळत आहे. मुख्य म्हणजे दीपिकाने दोन पारपत्र (पासपोर्ट) असणारा फोटोही शेअर केला आहे. त्यामुळे ते परदेशातीलच कोणा एका ठिकाणी गेल्याचा अंदाजही चाहत्यांनी वर्तवला आहे.
पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत
फोटो शेअर करत आपण कोणत्या ठिकाणी गेलो आहोत हे जाहीर न करता चाहत्यांना पेचात पाडण्याचा दीपिकाचा हा अंदाज साऱ्यांची मनं जिंकत आहे. मुख्य म्हणजे काही क्षणांमध्ये माध्यमं, चाहते, गर्दी आणि कामाचा व्याप यांचा हस्तक्षेप नसावाच याच एका उद्देशाने दीपिकाने केलेल्या या पोस्ट पाहण्याजोग्या आहेत.