मुंबई :  'ओम शांती ओम' या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका पदुकोण हिने चित्रपटसृष्टीत आपलं स्थान काम केलं. विविध धाटणीच्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिका साकारत दीपिकाने अभिनय विश्वात नावलौकिक मिळवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त चित्रपटच नव्हे तर बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक सुजाण व्यक्ती म्हणूनही तिने आपलं मत, निर्णय मांडल्याचं पाहायला मिळालं. पण, बी- टाऊनच्या याच सौंदर्यवतीच्या एका निर्णयामुळे मात्र तिच्या कुटुंबाला एक प्रकारची धास्तीच लागून राहिली होती. 


दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण हे बॅडमिंटन विश्वात अतिशय गाजलेले खेळाडू. पण, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रीडाविश्वात जाण्याऐवजी दीपिकाने मात्र वयाच्या १७ व्या वर्षीच कलाविश्वाकडे तिचा मोर्चा वळवला. 


इतक्या तरुण वयात स्वप्ननगरी मुंबईत येण्याचा निर्णय हा आपल्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असल्याचं खुद्द दीपिकाचच म्हणणं आहे. 


मुळात ज्या निर्णयाचा आपण कधीही फार विचार केला नाही, त्याचविषयी आज मागे वळून पाहताना त्याचं महत्त्वं लक्षात येत असल्याचं ती एका मुलाखतीत म्हणाली होती. 


मुंबईत येऊन मॉडेलिंगमध्ये करिअर सुरु करण्याचा दीपिकाचा हा निर्णय तिला फळला असला तरीही सुरुवातीला तिच्या याच निर्णयामुळे कुटुंबीयांची झोप उडाली होती. 


'इंडिया टुडे'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दीपिकाच्या त्या निर्णयानंतर कुटुंबीयांना वेगळीच चिंता सतावत होती. 


'आमच्यासाठी ती फार अवघड परिस्थिती / काळ होता. कारण, तेव्हा ती १८ वर्षांचीही नव्हती. अनोळखी शहरात तिच्याकडे राहण्यासाठी घरही नव्हतं. ती आपल्या चौकटीतून बाहेर पडण्यासाठी फारच लहान असल्याचं आम्हाला तेव्हा वाटत होतं', असं दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण म्हणाले. 


तिचा तो निर्णय धास्ती लावणारा असला तरीही आज मागे वळून पाहताना दीपिकाने योग्य तोच निर्णय घेतला होता. कारण, या कलाविश्वात कारकिर्दीची सुरुवात बरीच लवकर करवी लागते ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. 


आपल्या आई-वडिलांना वाटणारी चिंता दीपिकाही जाणून होती. पण, आपल्या ध्येय्यापासून तिने नजर हटू दिली नाही. 


करिअरप्रती असणारी तिची निष्ठा, जिद्द आणि चिकाटी याच बळावर दीपिका आजच्या घडीला बी- टाऊनमध्ये आघाडीची अभिनेत्री ठरली आहे हे नाकारता येणार नाही.