जाणून घ्या, लग्नाच्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच काय म्हणतेय दीपिका
काही दिवसांपूर्वीच तिने आणि रणवीरने लग्नाची अधिकृत घोषणा केली होती
मुंबई: आयुष्यात येणारं प्रत्येक वळण हे अनेकांसाठीच काही नवे अनुभव, आठवणी आणि तितकीच नवी मामसं घेऊन येतो. अशाच या वळणांवर आपलं पुरतं आयुष्यच बदलून जातं. सध्या कलाविश्वात अशाच एका वळणावर उभी आहे अभिनेत्री दीपिका पदुकोण.
काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. १४ आणि १५ नोव्हेंबर या दिवशी लग्नाची तारीख ठरल्याचं त्यांनी जाहीर केलं.
तेव्हापासूनच दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं. मुख्य म्हणजे ही जोडी सध्या त्यांच्या या खास दिवसासाठी फारच उत्सुक असल्याचं कळत आहे.
'इंडिया टुडे'शी संवाद साधतना दीपिकाने आपल्या मनीच्या भावना व्यक्त केल्या. इतर सर्व मुलींप्रमाणेच आपल्या मनातही अनेक भावना दाटून आल्याचं ती म्हणाली.
'अर्थातच मी उत्साही आहे. म्हणजे माझ्या पुढच्या चित्रपटासाठी होकार देतेवेळी असते तितकी मी उत्सुकही आहे. एखादी मुलगी ज्याप्रमाणे तिच्या आयुष्यात लग्नाची स्वप्न पाहते त्याचप्रमाणे मीसुद्धा या गोष्टीकडे पाहते. मला नाही वाटत लग्नानंतर माझ्या आयुष्यात फार बदल झालेले असतील', असं ती म्हणाली.
आपल्या आई- वडिलांच्याच वैवाहिक नात्याकडे एक आदर्श म्हणून पाहणाऱ्या दीपिकाने आपल्या वैवाहिक काळातही तसाच समतोल साधण्याचा प्रयत्न असेल अशी आशा व्यक्त केली. त्यामुळे आता दीपिकाला आणि रणवीरला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठीच चाहतेही शुभेच्छा देत आहेत.