मुंबई : 'महाभारत' या महाकाव्यावर चित्रपट साकारण्यात येणार अशा बऱ्याच चर्चा कामावर आल्या होत्या. पण, या चर्चांपेक्षा प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली होती ते म्हणजे असा चित्रपट साकारला असता त्यातील 'द्रौपदी'ची भूमिका कोण करणार, याविषयीची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असंख्य प्रश्न आणि उत्सुकता शिगेला पोहोचल्यानंतर आता याचं उत्तर समोर आलं आहे. अर्थात हे उत्तर काहींना अपेक्षितही असावं. कारण, ही भूमिका साकारण्याची जबाबदारी आहे बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यावर.  


खुद्द दीपिकानेच शुक्रवारी तिच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टविषयी अर्थात महाभारतावर आधारित चित्रपटाविषयीची माहिती दिली. 'आयएएनएस' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना तिने या चित्रपटाच्या निर्मितीतही आपलं योगदान असल्याचं अर्थात चित्रपटाती सहनिर्माती असल्याचं स्पष्ट केलं. हा चित्रपट, किंबहुना त्या माध्यमातून सादर केली जाणारी महाभारत कथा ही द्रौपदीच्या दृष्टीकोनातून साकारली जाणार आहे. याचविषयीची उत्सुकता व्यक्त करत ही भूमिका म्हणजे आपल्यासाठी  'role of a lifetime', असल्याचं तिने सांगितलं. 


'ही भूमिका मिळाल्याबद्दल मी प्रचंड उत्साही असून माझ्यासाठी ही अत्यंत मोठी आणि सन्मानाची बाब आहे. माझ्यासाठी ही जीवनातील अतीव महत्त्वाची भूमिका असेल. सहसा महाभारत हे त्यातील पौराणिक कथा आणि त्यातून एखादा सांस्कृतिक संदेश किंवा पुरुष पात्रांकडून मिळालेल्या आयुष्यभराच्या शिकवणीसाठी ओळखलं जातं. पम, हे एका नव्या माध्यमातून आणि दृष्टीकोनातून मांडणं हे कमालीचं औत्सुक्यपूर्ण आणि तितकंच महत्त्वाचंही असणार आहे', असं दीपिका म्हणाली. 



बाजीराव मस्तानीमधील मस्तानी, पद्मावतमधील राणी पद्मावती अशा ऐतिहासिक कथानकांवर आधारित चित्रपटातील भूमिकांना रुपेरी पडद्यावर जीवंत करणाऱी दीपिका आता द्रौपदीच्या रुपात नेमकी कशी दिसेल आणि कसं असेल तिने साकारलेल्या द्रौपदीच्या रुपातील महाभारत हे थेट पुढील वर्षीच्या दिवाळीमध्येच कळणार आहे. मुख्य म्हणजे आता द्रौपदी तर ठरली, पण त्यामागोमागच पांडव, कौरव, कर्ण अशा भूमिका कोणाच्या वाट्याला जाणार याविषयीची उत्सुकतासुद्धा कायम आहे.