मुंबई : हिंदी कलाविश्वातील कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळापासूनच बरीच मेहनत करणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली. बहुविध भूमिकांना न्याय देण्यासाठी म्हणून तिने सर्वार्थाने प्रयत्न केले. प्रेक्षकांनीही तिच्या या प्रयत्नांना भरभरुन दाद दिली. सध्याच्या घडीला बी- टाऊनमधील ही आघाडीची अभिनेत्री 'छपाक' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, दिल्लीतील चित्रीकरणाचा भाग काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाला आहे. ज्यानंतर दीपिका मुंबईत परतल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत 'छपाक'च्या उर्वरित भागाचं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच मिळालेल्या काही मोकळ्या वेळात दीपिकाने तिच्यातील खेळाडूला वाव दिला. सोशल मीडियात्या माध्यमातून खुद्द दीपिकानेच पोस्ट केलेल्या व्हिडिओतून याविषयीची माहिती मिळत आहे. ज्यामध्ये दीपिका एकटीच बास्केटबॉल हा खेळ खेळताना दिसत आहे. "all work and no play.........you get the drift!️" अशा कॅप्शनसह तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 



अभिनयाव्यतिरिक्त दीपिकाने नेहमीच खेळाला प्राधान्य दिलं आहे. बॅडमिंटनसोबतच ती एक चांगली बास्केटबॉलपटूही आहे. राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धांमध्येही तिचा सहभाग पाहिला गेला होता. त्यामुळे अभिनय कलेसोबतच वेळ मिळेल तेव्हा आणि शक्य असेल तेव्हा दीपिका तिच्या आवडीचा खेळ खेळण्यालाही प्राधान्य देतेय असंच म्हणावं लागेल. अभिनयातून उसंत मिळतात तिने धरलेली ही वाट प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. अर्थात ती उतरणारच, कारण दीपिका म्हणजे अनेकांच्याच काळजाचा ठोका आहे. 


दीपिका येत्या काळात मेघना गुलजार दिग्दर्शित छपाक या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऍसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यातील काही प्रसंगांवर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. दीपिका यात मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे, तर अभिनेता विक्रांत मेसी या चित्रपटाच्या निमित्ताने तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.