लग्नाआधी दीपिका-रणवीर देणार `या` ठिकाणाला भेट
सर्वाचेच डोळे सध्या दीपिका आणि रणवीरच्या लग्नसोहळ्याकडे लागून राहिले आहेत.
मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सध्या त्यांच्या चित्रपटाची कामं संपवण्याच्या मार्गावर आहेत. कारण पुढच्या काही काळासाठी हे दोघंही कामाच्या व्यापापासून दूर असणार आहेत. रणवीर आणि दीपिका १४ आणि १५ नोव्हेंबर या तारखांना विवाहबंधनात अडकणार आहेत. याच धर्तीवर ते काही दिवसांसाठी कलाविश्वापासून दूर राहणार आहेत.
एकिकडे लग्नाची तयारी आणि चित्रपटांच्या चित्रीकरणाची गडबड पाहता या दोघांनीही सध्या एकमेकांना वेळ देण्यास प्राधान्य दिल्याचं कळत आहे.
'पिंकव्हिला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार लग्नाच्या काही दिवस आधीच दीपिका गोव्याला रवाना झाली असून, रणवीरही लवकरच तिची साथ देण्यासाठी तेथे पोहोचणार असल्याचं कळत आहे.
लग्नापूर्वी एकमेकांसोबत काही खास क्षण हे दोघंही व्यतीत करणार असल्याचं कळत असून, त्यानंतर १० नोव्हेंबरला हे दोघंही इटलीला रवाना होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, रणवीरनेही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट केला होता. ज्या फोटोमध्ये तो गोव्यात असल्याचं कळत होतं. त्यामुळे येत्या काळात रणवीर दीपिका काही दिवसांसाठी गोव्यातच असणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
संपूर्ण कलाविश्व आणि चाहत्या वर्गाचे डोळे सध्या दीपिका आणि रणवीरच्या लग्नसोहळ्याकडे लागून राहिले आहेत.
दीपिकाच्या लेहंग्यापासून या सेलिब्रिटी जोडीच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांच्या यादीपर्यंत प्रत्येक गोष्टीविषयी कमालीची उत्सुकता आणि कुतूहल पाहायला मिळत आहे.