मुंबई : अमुक एका क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यावर आणि त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकत बायोपिक साकारण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये चांगलाच स्थिरावला. या ट्रेंडला प्रेक्षकांचाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला. बऱ्याच सेलिब्रिटींनी, आघाडीच्या कलाकारांनी या ट्रेंडमध्ये त्यांची कला सादर केली. तर, काहीजण मात्र अशा एखाद्या भूमिकेच्या प्रतिक्षेत आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणही त्यापैकीच एक. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला दीपिका परदेशात असून, पती रणवीर सिंग याच्यासोबत कबीर खान दिग्दर्शित '`८३' या चित्रपटाच्या चित्रीकरणात ती व्यग्र आहे. रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर या चित्रपटात कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारत आहे, तर दीपिका त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच रोमी देव यांच्या भूमिकेत दिसेल. 


अतिशय महत्त्वाकांक्षी कथानक असणाऱ्या या चित्रपटात काम करणारी दीपिका खुद्द एका खेळाडूच्या बायोपिकच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येऊ इच्छिते. अर्थात, तिची ही इच्छा जरा वेगळी आहे. वेगळी असण्याचं कारण की, एका पुरुष खेळाडूची व्यक्तीरेखा साकारण्याची इच्छा तिने बॉम्बे टाईम्सशी संवाद साधताना व्यक्त केली. तो खेळाडू म्हणजे खुद्द दीपिकाचे वडील आणि प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण. 


दीपिकाची ही निवड काहीशी अनपेक्षित असली तरीही तिने याविषयीच्या तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. '(हसत) मला स्त्री आणि पुरुषांमधील फरक कळतो. पण, जर मला एका खेळाडूची भूमिका साकारायची असेल तर, ती म्हणजे त्यांचीच (प्रकाश पदुकोण यांची) भूमिका असेल. किंवा मग इतर कोणा एका महान खेळाडूची. कारण,  अतिशय निवडक अशा सुविधा, सोयी आणि इतरही गोष्टींची उपलब्धता पाहता आजच्या खेळाडूंच्या तुलनेत त्यांनी बरंच यश संपादन केलं. गतकाळातील हे खेळाडू मला कायम प्रेरित करतात असं तिने स्पष्ट केलं. 



दीपिकाचा हा अजब आग्रह कितपत पूर्ण होईल याबाबत साशंकताच आहे. पण, आपल्या वडिलांनी संपादन केलेल्या यशाचं महत्त्वं जाणत त्यापासून प्रेरित होण्याचा मंत्र मात्र बॉलिवूडची ही सौंदर्यवती खऱ्या अर्थाने जपत आहे, असं म्हणायला हरकत नाही.